लासूर स्टेशन - आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी शिवसेनेचा एक-एक आमदार महत्त्वाचा असून उमेदवार कोण राहील हे पाहता पक्षाला मतदान करा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.
लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्स येथे शुक्रवारी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या वतीने गंगापूर-खुलताबाद, वैजापूर, कन्नड-सोयगाव या तीन विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी खैरे बोलत होते. व्यासपीठावर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, आमदार आर. एम. वाणी, हर्षवर्धन जाधव, प्रदीप जैस्वाल, माजी आमदार अण्णासाहेब माने, उपसभापती दिनेश मुथा यांची उपस्थिती होती.
या वेळी खैरे पुढे म्हणाले की, केंद्रात कॉँग्रेस-राष्ट्रीवादीचा जनतेने सुपडा साफ करून मोदींना पसंती दिली आहे. गोरगरीब, शेतकरी, उद्योजकांसह अनेकांच्या हिताकडे बघूनच महायुतीचे सरकार चांगले निर्णय घेत आहे. मागे युतीच्या काळात भारनियमन नव्हते. आघाडीच्या काळात विजेचे बिल देऊनही शेतकऱ्यांना वेळेवर वीज नाही. ही दुर्दैवी बाब आहे. यामुळे आता जनता वैतागली आहे. जिल्ह्यातील नऊही जागा जिंकण्याचा दावा खैरे यांनी केला आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही युतीला चांगले वातावरण असल्याने महाराष्ट्रावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करून गंगापूरकरांनी मागे केलेली चूक आता करू नये, असा सल्ला दिला.
मेळाव्यासाठी शिवसेनेच्या गटप्रमुखांसह पदधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याने त्यांनाच गंगापूरचे तिकीट मिळणार, अशी चर्चा मेळाव्यात सुरू होती. शिवाय व्यासपीठावर सेनेच्या भावी उमेदवारांची उपस्थिती दिसत होती.