औरंगाबाद - धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होणे ही अक्षम्य बाब असून दोन दिवसांत सुधारणा झाली नाही, तर महापालिकेवर गुन्हे दाखल करू, असा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला.
पाणी संकटाबाबत आज खैरे यांनी मनपाचे अधिकारी व महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. पाणीपुरवठा बिघडण्यामागे नेमके काय कारण आहे हे त्यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडून जाणून घेतले. याशिवाय महावितरणच्या अडचणीबाबत मुख्य अभियंता शिंदे यांच्याशीही चर्चा केली. जनतेचा रोष वाढत चालला असून कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, असा इशारा खैरे यांनी दिला. पाणीपुरवठ्यात खोडसाळपणे व्यत्यय आणला जाऊ नये, असे ते म्हणाले.
खासदार निधी देणार
हातपंपांची कामे का झाली नाहीत, असे खैरे यांनी विचारल्यावर पानझडे यांनी 12 वेळा टेंडर काढले असून मनपाकडून पैसे मिळत नसल्याने कोणी पुढे येत नसल्याचे ते म्हणाले. त्यावर खैरे यांनी तीन दिवसांत मनपा विशिष्ट लोकांची साडेतीन कोटी रुपयांची बिले काढते पण पाण्यासाठी पैसा देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत या कामासाठी खासदार निधीतून 50 लाख रुपये देण्यात येतील असे जाहीर केले.