आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Khaire Tenders Written Apology To Dalit Corporators

दलित नगरसेवकांना खैरेंचे माघारपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेतील नगरसेवकांना ‘डी गँग’ असे संबोधणार्‍या खासदार चंद्रकात खैरे यांना शिवसेनेचाच बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीवर दलित नगरसेवक आणि पक्ष-संघटनांच्या धरणे आंदोलनानंतर सपशेल माघार घ्यावी लागली. खैरे यांच्याविरोधातील घोषणाबाजीने गुलमंडी दणाणून गेली. खैरेंनी नमते घेतल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात मिलिंद दाभाडे, अमित भुईगळ, कृष्णा बनकर यांनी घोषणाबाजी करीत खैरे यांनी शहराचा बट्टय़ाबोळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत खासदार खैरे यांनी या नगरसेवकांना उद्देशून ‘डी गँग’ असा शब्द वापरला होता. त्यावरून दलित नगरसेवक आणि संबंधित पक्ष-संघटनांत संतापाची लाट उसळली होती. खैरे यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर खैरे यांनी डी गँग म्हणजे दर्डा गँग असल्याची सारवासारव केली होती, तरीदेखील वातावरण शांत झाले नाही.

दलित नगरसेवक आणि खासदार खैरे यांच्या या वाक्युद्धामुळे मागील संपूर्ण आठवडाभर शहरातील राजकीय वातावरण तापले होते. विविध पक्ष-संघटना व नगरसेवकांनी गुलमंडीवर धरणे आंदोलनाची घोषणा केली होती. हेआंदोलन आज मंगळवारी झाले.

यांचा सहभाग : या आंदोलनात नगरसेवक मिलिंद दाभाडे, अमित भुईगळ, कृष्णा बनकर, राजू शिंदे, विजेंद्र जाधव, जालिंदर शेंडगे, गौतम लांडगे, प्रमोद राठोड, बंडू प्रधान, के. व्ही. मोरे, प्रकाश जावळे, अरुण बोर्डे, प्रकाश निकाळजे, अशोक भातकुडे, राजू साबळे, दिनकर ओंकार, भदंत विशुद्धानंद बोधी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

लांडगेंनी केला समन्वय : शहरातील राजकारण ढवळून काढणारे हे प्रकरण स्फोटक होऊ न देता सामंजस्याने तोडगा काढण्याचे प्रयत्न पडद्यामागून सुरू होते. या प्रकरणात गौतम लांडगे यांनी समन्वयाची भूमिका घेतली. खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुंबईहून परतताच आज सकाळीच लांडगे यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर खैरे यांनी आपला खुलासा करणारे माघारपत्र तयार केले. ते नंतर लांडगे यांच्याकडेच सोपवण्यात आले. मिलिंद दाभाडे यांनी असे पत्र मिळाल्याचे आंदोलनस्थळी सांगत लांडगे यांना ते पत्र वाचून दाखवण्याची विनंती केली.

बालेकिल्ल्यात आंदोलन
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीवर आतापर्यंत कोणत्याही पक्षाने शिवसेनेविरोधात आंदोलन केले नव्हते. शिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिल्याने गुलमंडीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसीपी नरेश मेघराजानी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गुलमंडीची चारी बाजूंनी नाकाबंदीच केली होती.

घोषणाबाजी आणि भाषणे
आंदोलनाच्या ठिकाणी दलित नगरसेवक व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांनी खैरेंच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी केली. भदंत विशुद्धानंद बोधी यांनी खैरे यांनी दिलगिरी व्यक्त केली तर त्यांना मोठय़ा मनाने माफ करावे असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. काँग्रेसचे नगसेवक प्रमोद राठोड यांनीही या वेळी खैरे यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे सांगितले.

शिवसेनेची मोर्चेबांधणी
आंदोलनावर नजर ठेवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मछली खडक भागात खैरे यांच्या कार्यालयासमोर ठाण मांडून होते. त्यात आमदार प्रदीप जैस्वाल, गटनेते गजानन बारवाल, सभागृह नेते सुशील खेडकर, नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक यांचा समावेश होता. दीड तासानंतर आंदोलन संपल्यानंतर ही मंडळी रवाना झाली.

खैरे म्हणतात, पडदा पडला
आंदोलनानंतर खासदार खैरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या वादावर आता पडदा पडला आहे. दलित समाज आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडू नयेत म्हणून मी डी गँग हा शब्द मागे घेतला आहे. भारिप बहुजन महासंघाशी शिवसेनेचे मैत्रीचे संबंध आहेत. शिवसेनेच्याच कोट्यातून त्यांना स्थायी समिती सभापतिपदही दिले होते. शिवसेनेने कधीच जातीयवादाला थारा दिलेला नाही.

काय आहे पत्रात?
खैरे यांच्या पत्रातील मजकूर असा : मनपातील गोंधळासंदर्भात मी डी गँग असे वक्तव्य केले. या वक्तव्याने दलित समाजातील व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला. दर्डा गँग असा माझ्या वक्तव्याचा अर्थ होता, हे मी एका खुलाशात कळवलेही होते. प्रत्यक्षात दर्डांचा व या नगरसेवकांचा कोणताही संबंध नसल्याचे माझ्या लक्षात आले असून या वक्तव्याने दलित नगरसेवक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला होता. तो दूर व्हावा या हेतूने मी केलेले वक्तव्य मागे घेत आहे.

माघारपत्राचे वाचन
खैरे यांनी पत्र दिल्याचे मिलिंद दाभाडे यांनी जाहीर केले व गौतम लांडगे यांनी त्याचे जाहीर वाचन केले.