औरंगाबाद- हिंदू मुलीने मुस्लिम मुलासोबत विवाह केल्याने २०१२ मध्ये जवाहरनगर पाेलिस ठाण्यासमोर आंदोलन केल्याप्रकरणी खासदार चंद्रकांत खैरेंसह एकवीस जणांना अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी मंजूर केला. मागील तीन वर्षांत या प्रकरणाचा तपासच झाला नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
खासदार चंद्रकांत खैरेंसह जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, ऋषिकेश खैरे, सुशील खेडकर, छाया वेताळ, कला ओझा इतर एकवीस जणांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शेख सलीम यांनी एकवीस जणांना नोटिसा बजावल्या होत्या. याविरोधात सर्वांच्या वतीने अॅड. अभयसिंह भोसले, अॅड. दीपक पाटील अॅड. प्रदीप शिंदे यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. गुन्हा २०१२ मध्ये दाखल झाला. तीन वर्षांत तपास झाला नाही. सर्व शिवसेनेशी संबंधित असल्याने त्यांना गुन्ह्यात गोवल्याचा युक्तिवाद अॅड. भोसले यांनी केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केला. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील भीमराव पवार यांनी बाजू मांडली.