आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Kulkarni And Sachin Khedkar Speak At Aurangabad, News In Marathi

‘मौनराग’ने मंतरले नाट्यरसिकांचे विश्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद :मृत्यू आणि आयुष्य यांचा आकृतिबंध मांडणारे सत्य, बालपणीच्या आठवणीत मागे सोडलेला गाव, घराच्या व्याकूळ करणार्‍या आठवणींचा भारावलेला कार्यक्रम म्हणजे ‘मौनराग’. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि सिने-नाट्य अभिनेते सचिन खेडेकर यांनी प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ललित लेखांवर सादर केलेला आगळा- वेगळा प्रयोग पाहून औरंगाबादकर अक्षरश: मंतरल्यासारखे झाले होते.
मध्यंतरानंतर गावाकडील घराच्या ओढीने व्याकूळ झालेल्या भावनांचे विश्व ‘गहकूटं’ लेखाच्या वाचनातून सचिन खेडेकरांनी उभे केले. पारवा या गावी असलेले घर अचानकपणे कुटुंबीयांनी सोडले. लेखकाला मात्र अनेक आठवणींचा गदारोळ असलेल्या घराचा निरोप घेता आला नाही, याची खंत सतावत राहते. अवघ्या बारावर्षीय पोराच्या आठवणींचा जिवंत झरा, भावनांचा मेळा अध्र्यावर राहतो तो आर्तपणा सचिन यांनी आपल्या अभिनय आणि स्वरांतून उभा केला. उतारवयात एकदा तरी घर पाहण्याची मनाच्या कोपर्‍यात दडलेली इच्छा पूर्ण होते अन् प्रत्येक घराचा कोपरा न् कोपरा संवाद साधू लागतो. प्रत्येक खोलीचे सूक्ष्म निरीक्षण आणि पैलू जसेच्या तसे उभे करत ‘मौनरागा’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘सिद्धांत’च्या अध्यक्षा नीता पानसरे-वाळवेकर यांनी प्रास्ताविक केले. एमजीएमचे प्रतापराव बोराडे, रेखा शेळके, रवी मसालेचे फुलचंद जैन, रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे रत्नाकर कुलकर्णी यांचा सत्कार झाला. विकास वाळवेकर, विकास काटे, जगदीश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
निळ्या रंगाच्या प्रकाशझोतात जुन्या पद्धतीच्या बैठय़ा मेजपुढे बसलेले चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘जातस्य ही ध्रुवो मृत्यू:’ या लेखाचे आपल्या ओघवत्या शैलीत वाचन सुरू केले. अर्धसुप्त अवस्थेत पाहिलेले स्वप्न आणि पुढे लेखकाच्या बालपणीच्या आठवणींचे अनेक कप्पे टिपणारा प्रवास सुरू झाला. बालपणी घर सोडावे लागताना होणारी जिवाची घालमेल, अतिशय तरल भावना लेखातून प्रकट झाली, ती तितक्याच हळवेपणाने चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडली. प्रत्येक मनाला असणारे मृत्यूचे सुप्त भय मांडताना निर्भीडपणाही पुढे आला. अध्यात्म म्हणजे जीवन समजावून घेत जगणे, हा विचार विविध संदर्भांनी प्रेक्षकांच्या मनात रुजवला. आपल्या आयुष्यातील सुख-दु:खांना आपणच जबाबदार असल्याचे म्हणत लेखकाने दिलेला विचार कुलकर्णी यांनीही ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सिद्धांत फाउंडेशनच्या शुभारंभाचा हा निराळा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील जाणकार रसिक आणि दर्दींनी सभागृहात वेळेआधीच गर्दी केली होती.