आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chanfrakant Khaire Comment On Sperate Election Issue In Aurangabad

भाजपला सुनावले : वेगळे लढाल, तर पानिपत! - खासदार चंद्रकांत खैरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची भाषा भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाली असून त्याला आज मित्रपक्ष शिवसेनेने स्थानिक पातळीवर जोरदार उत्तर दिले. 1990 च्या दशकात औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची इच्छा अव्हेरून भाजप एकटा लढला होता. तेव्हा त्यांची एकही जागा आली नव्हती. त्यानंतर त्यांना सेनेशी युती करणे भाग पडले. या वेळीही तशीच भाषा केली, तर पानिपत होईल. भाजपने एकदा इतिहासाची पाने चाळून बघावी, अशा शब्दांत शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांनी सुनावले, तर सिल्लोड आणि फुलंब्री या दोन मतदारसंघांवर शिवसेनेचा दावा असून आम्ही जिल्ह्यातील सर्व 9 मतदारसंघ लढवण्यास सज्ज आहोत, असे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी स्पष्ट केले.
‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र ’ या शिवसेनेने सुरू केलेल्या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पदाधिकारी-लोकप्रतिनिधी मेळाव्याचे शनिवारी येथील तापडिया नाट्यमंदिरात आयोजन करण्यात आले होते. याच्या समारोप समारंभात दोन्हीही नेत्यांनी भाजपला थेट इशारा दिला. या शिबिरास पक्षाचे आजी-माजी आमदार, महापौर, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, गट व विभागप्रमुख उपस्थित होते. खैरे म्हणाले, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, त्यासाठी हिंदुत्वाची भूमिका असणा-यांनाही सोडणार नाही, मात्र ते स्वतंत्र लढण्याची भाषा करणार असतील तर त्यांनाही सोडणार नाही. स्वतंत्र चूल मांडण्याची भाषा केल्यानंतर याच महानगरपालिकेत भाजपचे काय हाल झाले होते हे एकदा तपासून बघावे, असा सल्ला त्यांनी दिला. पालिकेतील गटनेते संजय केणेकर यांनी स्वतंत्र लढण्याची मागणी केल्याची चर्चा आहे. त्यावर ते म्हणाले, कोण हा गटनेता, तो स्वबळावर त्याच्या वॉर्डातून तरी निवडून येईल का?

जैस्वालांनी हरामखोरी केल्याने विरोधी पक्षनेतेपद गेले : 2010 मध्ये शिवसेनेला भाजपपेक्षा फक्त एकच जागा कमी पडल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेल्याचे घोसाळकर यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, आपल्याला फक्तएक आमदार कमी पडला, तेव्हा प्रदीप जैस्वाल यांनी हरामखोरी केली. त्यांनी हरामखोरी केली नसती तर विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे आले असते, काही कामे करता आली असती. असे असले तरी जैस्वाल आता आपल्या घरातील सदस्य असल्याचा उल्लेख करण्यास ते विसरले नाहीत. जैस्वाल यांनी बंडखोरी केली, असे ते म्हणाले असते तर कोणाला वावगे वाटले नसते. मात्र जाहीर कार्यक्रमात जैस्वालांच्या बंडखोरीला त्यांनी हरामखोरी ठरवल्यामुळे येत्या काळात शिवसेनेत काय होईल, यावर काही सैनिकांनी खासगीत नाराजी व्यक्त केली.
मी आता करणार पॉलिटिकल गेम : खैरे
लोकसभा निवडणुकीत युतीला मुस्लिमांची मते पडली नाहीत. ती पडणारही नाहीत. त्यामुळे अशा मतदारांचा उगाच पुळका आणता कामा नये. त्यांची कामेही करू नयेत. तुम्ही फक्त हिंदू मतांवर लक्ष केंद्रित करा. बाकीचे जे काही पॉलिटिकल गेम करायचे आहेत, ते मी करेन. कारण आता मला काहीही काम नाही. पक्षाने कोणालाही उमेदवारी द्यावी, मी निवडून आणणारच, असा दावाही त्यांनी केला.

नऊ मतदारसंघांची तयारी
जिल्ह्यातील 9 पैकी 9 विधानसभा मतदारसंघ लढवण्याची शिवसेनेची पूर्ण तयारी असल्याचे घोसाळकर यांनी स्पष्ट केले. पक्षाची ताकद सर्वत्र वाढली असून युती राहिली, तरी फुलंब्री आणि सिल्लोड या दोन मतदारसंघांची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. याचा अहवाल मी पक्षप्रमुखांना देणार असून हे मतदारसंघ मिळत नसतील, तर 9 मतदारसंघांत लढण्याची तयारी असल्याचेही कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोराळकरांनी साधा फोनही केला नाही
पदवीधर निवडणुकीत शिरीष बोराळकर यांचा निसटता पराभव झाला. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदानापर्यंत या उमेदवाराने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना साधा फोनही केला नाही. आम्हीच फोन करून मतदार यादी मागवत होतो. त्यांनी संपर्क साधला असता, तर कदाचित ते विजयी झाले असते, असे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. पक्षात समन्वय ठेवायचा असेल, तर आपण बोलले पाहिजे.

मोदींची हवा नव्हे, आमचे नेटवर्क स्ट्राँग होते
लोकसभा निवडणुकीत मोदींची हवा होती असे म्हटले जाते. ती जास्तीत जास्त दोन-चार टक्के असेल. प्रत्यक्षात आमचे नेटवर्क स्ट्राँग होते अन् जर मोदींची हवा होती असे म्हणता, तर पंप तर आमचाच होता. त्यामुळे हवा वगैरे काही नाही, जे काही यश आहे त्यात सेनेचा मोठा वाटा असल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला. पंप चांगला होता म्हणूनच हवेचा फायदा घेण्यात आल्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई तथा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. त्याचबरोबर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट यांनीही हवा नव्हतीच, जे यश मिळाले त्यात आमच्या नेटवर्कचाच वाटा मोठा असल्याचा दावा केला.