आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिम समाजातील बदलत्या प्रवाहाचे जोरदार स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी हुंडा घेणार नाही, व्यसन करणार नाही असा निर्धार करत परिवर्तनाची नांदी देणार्‍या मुस्लिम तेली समाजाच्या हाकेला सर्वच जाती-धर्मांच्या नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. आदर्श आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी या ‘काबील-ए-तारीफ’ उपक्रमाची व्याप्ती केवळ मुस्लिम तेली समाजापुरतीच न ठेवता याचा सर्वत्र प्रसार होणे गरजेचे असल्याचे अनेक शहरवासीयांनी डीबी स्टारला फोन करून सांगितले. आम्ही या चांगल्या गोष्टी आचरणात आणूच, शिवाय समाजात आणखी व्यापक जनजागृतीसाठी याचा प्रसारही करू, असा निर्धार आज शेकडो तरुणांनी व्यक्त केला.
मुस्लिम विचारवंत मिर्झा अब्दुल कय्युम बेग नदवी यांनी स्थापन केलेल्या ‘ऑल महाराष्ट्र असोसिएशन फॉर वेल्फेअर ऑफ मुस्लिम तेली कम्युनिटी संघटने’ने अनिष्ट रुढी मोडकळीस काढण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. या समाजातील तरुणांनी लग्न साधेपणाने करणार, महागड्या खर्चाला फ ाटा देणार, अन्नाची नासाडी थांबवणार, हुंडा घेणार नाही, घटस्फोट देणार नाही, व्यसनांपासून दूर राहणार, स्त्री भ्रूणहत्या करणार नाही आणि करूही देणार नाही, असा निर्धार केला आहे. सर सय्यद महाविद्यालयातील अरबी भाषा विभागप्रमुख मौलाना डॉ. अब्दुल रशीद मदनी नदवी, जाकीर हुसैन हायस्कूलचे शिक्षक मौलाना मोहम्मद सादेक नदवी व धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद अमीन कासमी यांनी पवित्र कुराणमधील संदर्भ सांगून या बाबी स्पष्ट केल्या. याबाबत डीबी स्टारने 4 ऑगस्ट रोजी हुंडा घेणार नाही, व्यसन करणार नाही, हे वृत्त प्रकाशित केले. मुस्लिम धर्मीयांसह समाजातील सर्वच थराच्या नागरिकांनी याचे उत्स्फूर्त स्वागत केले. यापैकीच या काही निवडक प्रतिक्रिया..
बदल घडवणारच
डीबी स्टारने दुर्लक्षित अशा प्रश्नावर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे आमच्या लहानशा समाजाचा आवाज दूरपर्यंत पोहोचू शकला. ही सुरुवात आहे. ही मोहीम खूप पुढे घेऊन जायची आहे. आम्ही बदल घडवण्यात यशस्वी होऊ हा आत्मविश्वास आम्हाला आहे.
मिर्झा अब्दुल कय्युम बेग नदवी, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र मुस्लिम तेली समाज

गंभीर विषयाला वाचा फोडली
डीबी स्टारने मुस्लिम समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. अनेक अनिष्ट बाबी सोडण्यासाठी मुस्लिम तेली समाजाने निर्धार केला आहे. केवळ मुस्लिमच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी तो उपयुक्त आहे. त्याचे पालन केले तर सर्वांनाच सुखी आणि समाधानी आयुष्य जगता येईल.
कवी दरबार खान
ही तरुणांची जबाबदारी
हुंडा घेणे किंवा व्यसनाधीनता ही कोणा एका समाजाची समस्या नाही. याबाबत मोठय़ा स्तरावर जागृती व्हायला हवी. त्यात प्रसारमाध्यमांची भूूमिका महत्त्वाची आहे. डीबी स्टारने मांडलेले मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांचे पालन करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. आम्ही शाळेत या बाबींचा प्रसार करू.

जयदेव भोसले, शिक्षक

काटेकोरपणे पाळणार
डीबी स्टारच्या बातमीतील सूचना सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आवश्यक आहेत. मी आणि माझे कुटुंब या प्रतिज्ञांचे पालन करणारच आहोत. शिवाय आमच्या समाजबांधवांनाही याची माहिती देण्याचा निर्धार मी स्वत: केला आहे.
कलिम पटेल, रहिवासी, बायजीपुरा
आधी करणार, मग इतरांना सांगणार
चुकीच्या बाबी सोडण्याचा निर्धार हा मुस्लिम समाजाचा एक लहान भाग असणार्‍या तेली समाजाने केला आहे; पण माझ्या मते या बाबी सर्वच धर्मीयांनी पाळायला हव्यात. आम्ही स्वत: याचे पालन करू, मग इतरांना सांगू.
गफार बेग, रहिवासी, रामनगर
दुर्लक्षित बाबीकडे लक्ष वेधले
मुस्लिम समाज हा प्रसार माध्यमांमध्ये क ाहीसा दुर्लक्षित आहे. या समाजाच्या समस्यांना वृत्तपत्रात फारशी जागा मिळत नाही. परंतु डीबी स्टारने अनिष्ट प्रथांची दखल घेत त्या सोडवण्यासाठी तरुणांनी केलेल्या निर्धाराला प्रकाशित करून योग्य प्रसिद्धी दिली आहे. ही अभिनंदनीय बाब आहे. खरे तर असा निर्धार सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसाठी उपयोगी आहे. हे वृत्त समाजाला दिशा देणारे आहे.
प्र. ज. निकम गुरुजी आणि बाळूलाल गुर्जर,ज्येष्ठ नागरिक
गावात प्रसार करणार
डीबी स्टारचे वृत्त डोळ्यात अंजन घालणारे आहे. तरुणांनी चांगले शिक्षण घेऊन समाज बांधणीसाठी काम करायला हवे. काळानुरूप जुन्या रीतीरिवाजांना फाटा द्यायला हवा. या वृत्तातील सूचनांचा मी स्वत: गावातील तरुणांमध्ये प्रसार करणार आहे.
डॉ. दिलावर बेग, सरपंच, वरूड काझी.