आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्टद्वारे दिला बचतीचा धडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीच्या वाढदिवसानिमित्त वैभव राजूरकर यांनी वसाहतीतील लहान मुलामुलींना बँकेचे खाते उघडून दिले. छाया : रवी खंडाळकर - Divya Marathi
मुलीच्या वाढदिवसानिमित्त वैभव राजूरकर यांनी वसाहतीतील लहान मुलामुलींना बँकेचे खाते उघडून दिले. छाया : रवी खंडाळकर
औरंगाबाद - गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबीयांत पैशाचे स्रोत मर्यादित आहेत. त्यामुळे योग्य नियोजन आणि बचतीची सवय करून घेतल्यास अनेक कामे सहज मार्गी लागू शकतात, हा पहिला धडा राजूरकर दांपत्याने मुलांना वाढदिवसाचे रिटर्न गिफ्टच्या माध्यमातून दिला. राजूरकर यांनी बच्चे कंपनीला बँकेचे बचत खाते उघडून देत प्रत्येकाच्या खात्यात १०१ रुपये जमा केले.
नक्षत्रवाडी परिसरातील वैभव राजूरकर आणि मीनल राजूरकर या दांपत्याने मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला दिलेले रिटर्न गिफ्ट सर्वांना आयुष्यभर आठवणीत राहील असेच ठरले आहे. परिसरातील १५ मुलांची त्यांनी बँकेत खाती उघडून दिली. मुलगी वेदांतीचा वाढदिवस अविस्मरणीय करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनधन योजना राबवली अन् देशातील प्रत्येकाला स्वत:चे खाते असावे ही संकल्पना मांडली. मात्र, लहान मुलांचे खाते काढण्यासाठी फारसे कुणी लक्ष देत नाही. राजूरकर दांपत्याने हाच धागा पकडून अनोख्या रिटर्न गिफ्टच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी महिनाभर आधीपासून तयारी केली.

अशी सुचली कल्पना : वैभवराजूरकर यांनी सांगितले की, पत्नी मीनल सारस्वत बँकेत आहे. मुलीच्या जन्मानंतर तिच्या भविष्याची सोय म्हणून आम्ही तिचे खाते उघडले. तिला भेट मिळालेले पैसेही आम्ही या खात्यात जमा करत राहिलो. तिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार सुरू असतानाच तिचे पासबुक बघितले. तेव्हा तिच्या खात्यावर मोठी रक्कम जमा झाली होती. ही बचत अशीच करत राहिलो तर काही वर्षांनी तिच्या शिक्षण किंवा विवाहाची सोय सहज होईल. यावरून रिटर्न गिफ्ट म्हणून सर्व लहान मुलांना बँक खाते उघडून देण्याची कल्पना सुचली. आम्ही खाते उघडून देतो. पुढे तुम्ही खाते चालवण्याचे मुलांनीही मान्य केले.
हे रिटर्न गिफ्ट वेगळेच
आम्ही वेदांतीच्या वाढदिवसाला आलो तर तिने आम्हाला खूप वेगळे रिटर्न गिफ्ट दिले आहे. आज ते उपयोगी येणार नाही, मात्र जेव्हा आम्ही मोठे होऊ तेव्हा फायदा होईल. त्यामुळे वेदांतीचा पहिला वाढदिवस आमच्यासाठी कायम लक्षात राहील. पवन मुळे, विद्यार्थी
बँकेत मिळेल व्याजही
लहान मुलांच्या हाती पाहुणे पैसे देतात. ते असेच खर्च होतात. मुलांच्या शिक्षणाला पैसा लागतात तेव्हा चणचण भासते. पाहुण्यांनी दिलेले किंवा मुलांनी जमवलेले पैसे असतील तर ते कामी येतात. पिगी बँकेत पैसे टाकण्याऐवजी ते बँकेत जमा केल्यास व्याज मिळते. मीनल राजूरकर, आई