आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Character Certificate Must For Teachers In Aurangabad

गुरुजींनाही द्यावे लागेल आता चारित्र्याचे हमीपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विद्यार्थिनींशी सभ्य वर्तन करणार, असे हमीपत्र शिक्षणकांकडून लिहून घेण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिले आहेत. या आदेशाचा शिक्षक संघटनांनी निषेध केला असून उच्च शिक्षणमंत्र्यांना या निर्णयाविषयी जाब विचारू, असा इशारा दिला आहे.

शिक्षकांकडून विद्यार्थिनींशी असभ्य वर्तणुकीचे काही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी योग्य ती काळजी घ्यावी. असे प्रकार घडल्यास ते समोर आणावेत. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी हमीपत्र लिहून घेण्याचा उपाय उच्च शिक्षण विभागाने काढला आहे, तर या निर्णयामुळे शासन शिक्षकी पेशावर अविश्वास दाखवत असून एका व्यक्तीने गुन्हा केला म्हणजे त्या क्षेत्रातील सर्वच व्यक्ती गुन्हेगार ठरत नाहीत. असे नियम तयार करणार्‍यांनी प्रथम स्वत:चे चारित्र्य तपासून घेण्याची गरज असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. याप्रकरणी उच्च शिक्षणमंत्र्यांनाही जाब विचारण्यात येईल, अशा प्रतिक्रिया संघटनांनी दिल्या आहेत.

शासन शिक्षकांना वेठीस धरत आहे
ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम शासन करत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केल्यास मुप्टा संघटना आंदोलन करेल. हा निर्णय घेण्याचे कारण आम्ही उच्च शिक्षणमंत्र्यांना विचारणार आहोत. - डॉ. शंकर अंभोरे, विभागीय अध्यक्ष, मुप्टा

एकाच माळेत मोजू नका
हा प्राध्यापकांचा आणि शिक्षकी पेशाचा अपमान आहे. एखाद्या व्यक्तीमुळे सर्वांना एका माळेत मोजणे हे धोरण चुकीचे आहे. यासंदर्भात शासनाला एमफुक्टोच्या वतीने जाब विचारण्यात येईल. तसेच याचा आम्ही निषेध करत आहोत. डॉ. अशोक तेजनकर, उपाध्यक्ष, एमफुक्टो

कायद्याची गरज काय?
हमीपत्र भरून घेऊन प्रश्न मिटत असतील तर कायदे करण्याची गरजच काय आहे? हा निर्णय म्हणजे शिक्षकांना वेठीस धरणे आहे. कोणाच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा याचे भान शिक्षण विभागाला तरी असायला हवे. डॉ. शिवानंद भानुसे, जुक्टो संघटना सदस्य