आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर "त्या' ठेकेदारावर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- औरंगाबाद-जळगाव महामार्गावर केबल लाइनसाठी खोदून नंतर बुजवलेल्या खड्ड्यात खासगी बस अडकली. सुदैवाने यातील १४ प्रवासी बचावले असून मोठा अनर्थ टळला होता. अजिंठ्याजवळील वाघूर पुलानजीक ही घटना घडली होती. याबाबत "दिव्य मराठी'ने १७ सप्टेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर ठेकेदारावर शुक्रवारी उशिरा रात्री अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नानासाहेब गायकवाड यांच्या तक्रारीवरून महेश मंसकराव मुंडे (रा. परळी, ठेकेदार) अण्णा काळूराम कुलारे व सुपरवायझर मुरलीधर वासुदेव नेमाडे यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, लिहाखेडी ते गोळेगावपर्यंतच्या रस्त्यालगत खोदकाम ठेकेदाराने केले होते. त्यांनी सा.बां. विभागाची कसलीही परवानगी न घेता बुलडोझर व मजुरांच्या साह्याने डांबरी रस्त्याचे खोदकाम करून अरुंद केला व खड्ड्याची माती रस्त्यातच टाकून अडथळा निर्माण केला. त्यामुळे रस्ता विद्रूप झाला असून अपघातास कारणीभूत ठरल्याचे नमूद आहे.
मुंडे नावावर सुरू होती दादागिरी
मुंडे नावाचा संबंधित ठेकेदार परळी येथील आहे. ठेकेदारांच्या मंडळींना याबाबत सा.बां. विभागाकडून विचारणा केली असता, आमचे मुंडेसाहेब परळीचे आहेत. ते पंकजाताईंच्या जवळचे आहेत, असे सांगत असल्याने अधिकारी कारवाई करण्यास घाबरत होते. अखेर "दिव्य मराठी'त हे वृत्त प्रकाशित होताच अधिकाऱ्यांनी कारवाईची तसदी घेतली.
आमची परवानगी घेतलीच नाही
ठेकेदार महेश मुंडे यांनी रस्त्यालगत खड्डे खोदण्यासाठी परवानगी घेतली नव्हती. महामार्गालगत खड्डा खोदणे, रस्ता विद्रूप करणे, अपघातास कारणीभूत ठरणे यावरून आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
एम. कांडलीकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता, सिल्लोड.