आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची कामे बोगस करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार - आयुक्तांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील रस्त्यांची दुरवस्था असून रस्ते विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच रस्त्याच्या दर्जालाही महत्त्व दिले जाईल. ही कामे निकृष्ट झाल्याचे आढळून आले तर ठेकेदारांवर गुन्हा नोंदवून देखरेख करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शुक्रवारी दिला.

रस्त्यांची कामे होऊनही तक्रारी सुरूच असल्याने यापुढे रस्त्यांच्या दर्जांची जास्त दखल घेतली जाईल. जर ते दर्जाहीन आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर कोणतीही मेहेरबानी करता त्यांना थेट ब्लॅक लिस्ट करण्यात येईल, असे बकोरिया म्हणाले. शहरात पाणी, ड्रेनेज आणि रस्त्याची मोठी समस्या आहे. ड्रेनेजचे काम सुरू असून समांतरचे प्रकरण न्यायालयात आहे. प्रशासनाने आपले म्हणणे मांडले आहे. रस्त्यांचा विषय महत्त्वाचा असल्याने त्याकडे लक्ष देण्यात येणार अाहे. शहराची पर्यटन शहर म्हणून घोषणा झाल्याने शहरातील दरवाजांचे सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. मनपातील सर्व विभागातील बदल्या एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असून प्राणिसंग्रहालयाचे संचालक नाईकवाडे यांच्यावर सध्या प्रशासकीय कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एक एप्रिलपासून मालमत्तांचे फेर सर्वेक्षण
शहरातीलमालमत्तांचे फेर सर्वेक्षण एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असून संस्थेची निवड करण्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक एप्रिल पूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

नोटिसीच्या उत्तरानंतरच कंपनीला पेमेंट
समांतरप्रकल्प राबवणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या व्यवहारावर लेखा परीक्षणात आक्षेप आले आहेत. त्यामुळे कंपनीला नोटीस देण्यात आली असून कंपनीने खुलासा केल्यावरच पेमेंट केले जाईल, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले.

कंपनी आणि मनपाचे जॉइंट अकाउंट असतानाही कंपनीने अॅक्सिस बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यात एक कोटी रुपये वळवले आहेत. त्यामुळे मनपाचेही १२ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे लेखा परीक्षणात समोर आले. त्यामुळे पालिकेने कंपनीला नोटीस दिली होती. त्यावर खुलासा देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला असून कंपनीच्या वतीने सोमवारी किंवा मंगळवारी खुलासा देण्यात येणार आहे. समांतरचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. प्रशासनाने न्यायालयात शपथपत्र सादर केले. या योजनेबाबत न्यायालय आणि शासनच निर्णय घेईल. पण तोपर्यंत कंपनीकडून काम करवून घेतले जाईल, असे सांगितले.

करवसुलीसाठी १२ विभाग प्रमुख रस्त्यावर
या वर्षीची कर वसुली करण्यासाठी शेवटचे १०-१२ दिवस शिल्लक आहेत. मनपाने शंभर कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ६८ कोटी रुपये वसुलीपर्यंत मनपाला मजल मारता आली. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाच्या वतीने मनपाचे १२ विभाग प्रमुख आणि त्यांच्या मदतीसाठी प्रत्येकी पाच सहायक नियुक्त करण्यात आल्याचे बकोरिया यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...