आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पान टपरी घुसून चार्ली पोलिस करताहेत दादागिरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा बसावा म्हणून चार्ली पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, पण हेच चार्ली गुटखा विक्रीच्या नावाखाली टपरीचालकाला हैराण करत असल्याचे उघड झाले आहे. कारवाई करताना ओळख लपवण्यासाठी त्यांनी नेमप्लेट काढून ठेवल्याचे टपरी चालकाचे म्हणणे आहे. त्यांची ही दादागिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.

बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एका पानटपरीत दोन चार्ली घुसले. काउंटरच्या पलीकडे जाऊन गल्ला उघडला आणि उद्धट भाषा वापरत टपरीतील पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त टाकले. टपरी चालकाच्या मते ही कारवाई जर वरिष्ठांची असती तर त्यांनी नेमप्लेट कायम ठेवली असती. वाहनचालकांना मारहाण करणे, ट्रॅव्हल्स आणि रिक्षाचालकांकडून चिरीमिरी घेणे असे अनेक आरोप सध्या चार्लींवर होत आहेत. दरम्यान, गुटखा किंवा अन्न पदार्थाची कुठलीही कारवाई करायची असल्यास ती अन्न औषध प्रशासन आणि पोलिस खाते यांची संयुक्त कारवाई असते, असे अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पवार म्हणाले.

नेम प्लेट आवश्यकच
ज्यावेळी पोलिस कर्मचारी गणवेश घालतो, त्या वेळी त्याला नेमप्लेट घालणे आवश्यकच आहे. मात्र, पोलिसांना अशा प्रकारची माहिती मिळाल्यास ते चौकशी करू शकतात. रमेशगायकवाड, सहायकपोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

पोलिसांना सहकार्य पण...
३०वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी टपरी चालवतो. मात्र, कधीही गुटखा विकला नाही. पोलिसांना आतापर्यंत मी नेहमी सहकार्य केले. याअगोदरही दोनदा हेच चार्ली येऊन गेले. यांना पूर्ण सहकार्य केले. मात्र, अशी अरेरावी आणि दादागिरी केली तर आमच्या मनातील पोलिसांची प्रतिमा खराब करते. टपरीचालक