औरंगाबाद- तज्ज्ञांचे (स्टडी ग्रुप) नियोजन, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. मात्र, राजकारण्यांना जाब विचारणारे नागरिकच शहराची दशा आणि दिशा बदलू शकतील, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. करुणाभाभी व चंद्रगुप्त चौधरी स्मृती प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात ‘औरंगाबाद शहराचा विकास-दशा आणि दिशा’ या विषयावर आयोजित परिसंवादात निवृत्त सनदी अधिकारी कृष्णकांत भोगे, उद्योजक मानसिंग पवार, कामगार नेते कॉ. भालचंद्र कांगो आणि निवृत्त न्यायाधीश बी. ए. मर्लापल्ले यांनी मते व्यक्त केली.
पवारांचे प्रेझेंटेशन: उद्योजक मानसिंग पवार यांनी पॉवर पॉइंट पे्रझेंटेशनद्वारे येत्या 15 ते 20 वर्षांत शहरालगत नवीन स्मार्ट सिटी कशी होईल, त्यामुळे औद्योगिक तसेच पर्यटनाचा विकास कसा होईल, याची माहिती दिली. या काळात 75 हजार कोटींची गुंतवणूक आणि 10 लाख युवकांना येथे रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले.
सिमेंट रस्त्याची गरज ती काय: जेथे जास्त पाऊस होतो तेथे सिमेंटचे रस्ते योग्य राहतात. कारण एक किलोमीटर सिमेंट रस्त्यासाठी 20 कोटी रुपये खर्च येतो. डांबरासाठी हा खर्च अवघा 2 कोटी आहे. मराठवाड्यात पाऊसच पडत नाही, तेव्हा येथे जास्तीचा खर्च कशाला, असा सवाल भोगे यांनी केला.
नागरिकांनी वॉच डॉग व्हावे: 1990 पर्यंत औरंगाबादचा नियोजनबद्ध विकास झाला. आज लोकसंख्या 12 लाखांवर गेली अन् बसची संख्या फक्त 10 आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुधारावी लागेल. नागरिकांनी वॉच डॉगसारखी यंत्रणा उभारली तरच सुविधा उपलब्ध होतील. स्मार्ट सिटीमुळे शहरावरील ताण वाढेल. यासाठी आतापासून कामाला लागावे, असे मान्यवरांनी सांगितले. देविदास तुळजापूरकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.