आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chavani Parishad Election Court Comment On Same Issue

छावणी परिषदेच्या निवडणुकीसंबंधी हायकोर्टाची नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छावणी परिषदेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक सातमधून निवडणूक लढवत असलेल्या अर्चना सरकटे यांच्या उमेदवारीस आक्षेप घेणाऱ्या याचिकेत औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांनी सात प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. सरकटे यांच्या उमेदवारीवर सोमवारी (५ जानेवारी ) सुनावणी ठेवण्यात आली आहे.

छावणी परिषदेची निवडणूक ११ जानेवारीला होत आहे. यात वॉर्ड क्रमांक सातमधून सरकटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिभा करणसिंग काकस यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. काकस यांनी सरकटे यांच्या उमेदवारीविरोधात छावणीचे सीईओ, अध्यक्ष ब्रिगेडियर मनोजकुमार, कमांडिंग अधिकारी पुणे आदींसह इतरांकडे निवेदन दिले. अर्चना यांचे पती अनिल सरकटे सौन्यदलात अधिकारी असून सैन्याच्या निवासस्थानामध्ये त्यांचे वास्तव्य असल्याचे काकस यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले होते.
आर्मी अॅक्ट १९५० व १९५६ मधील तरतुदीनुसार सैन्यदलात सेवेत असलेल्या व्यक्तीला अथवा त्याच्या कुटुंबास छावणी परिषदेची निवडणूक लढवता येत नाही. या आक्षेपाकडे दुर्लक्ष झाल्याने काकस यांनी हायकोर्टात अॅड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली.

सैन्याच्या रहिवासी भागात प्रचार करता येत नसून, सरकटे सैन्यात अधिकारी असल्याने त्यांच्या पत्नीस निवडणूक लढवता येत नसल्याचा युक्तिवाद या वेळी करण्यात आला. हायकोर्टाने प्रकरणातील सात प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून सुनावणी ५ जानेवारीला ठेवली आहे.