आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात स्वस्त कारची औरंगाबादेत चाचणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘हमारा बजाज’ म्हणत समस्त भारतीयांच्या मनावर राज्य करणा-या बजाज उद्योग समूहाने सर्वात स्वस्त आणि दर्जेदार कार ग्राहकांच्या हाती देण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त निवडला आहे. वाळूज प्रकल्पात ‘आरई-60’ या कारची टेस्टिंग सुरू झाली आहे. मराठवाड्यातील सुमारे एक हजार छोट्या उद्योजकांना यामुळे संजीवनी मिळेल. शिवाय, सुमारे 5 हजार कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

कंपनी व्यवस्थापनाने प्रकल्पाच्या मंजुरीचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी एमआयडीसीच्या तांत्रिक विभागासह राज्य शासनाकडे सादर केला. दिवाळीनंतर औरंगाबादमध्ये निर्मित ही कार भारतासह श्रीलंका, इजिप्त, कोलंबिया आणि बांगलादेशच्या रस्त्यावर धावताना दिसेल. या कारची किंमत 1 लाख 30 हजारांपासून सुरू होईल तर ताशी वेग 90 किलोमीटर असेल.

बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी 5 नोव्हेंबर 2012 रोजी दिल्लीतील प्रगती मैदानात भरलेल्या ऑटो एक्सपोमध्ये ‘आरई- 60’ कारचे लॉचिंग करून तिची निर्मिती औरंगाबादेत होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार निसान मोटर्स आणि रेनॉल्ट या कंपन्यांच्या सहकार्याने वाळूजमध्ये बजाज कंपनीतील थ्री व्हीलरच्या प्लॅँटची क्षमता वाढवून त्याच ठिकाणी कार तयार केली जाणार आहे. या प्रयोगामुळे कंपनीची 350 कोटींची बचत होणार आहे. थ्री व्हिलरच्या उत्पादनासाठी 3,68,363.84 स्क्वेअर मीटरचा शेड तयार होता. यालगतच 21152.86 चे नवीन बांधकाम करून एकूण 3,89,516.70 स्क्वेअर मीटरच्या सुधारित बांधकामास मंजुरी देण्याची परवानगी कंपनीने मागितली आहे.

लेबर सप्लाय एजन्सी संपर्कात
लेबर सप्लाय करणा-या एजन्सींनी आतापासूनच बजाज कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला आहे. कुशल कामगारांसाठी बजाजच्या व्यवस्थापनानेही मुंबई, पुणेसह नाशिकच्या मोठ्या उद्योजकांकडून कामगारांची माहिती घेणे सुरू केल्याचे समजते.

परदेशातही तेवढीच क्षमता
परदेशातील रस्त्यावर तेवढ्याच क्षमतेने धावेल असा या कारचा दर्जा आहे. भारतात या कारच्या श्रेणीला मान्यता मिळण्यासाठी काही आवश्यक बाबींची पुर्तता केली जात आहे. ही कार कॉटेज सायकलच्या श्रेणीमध्ये मोडत असल्याने शासनाकडून मंजुरी मिळण्यास काही अडचणी येत आहेत. तरीही जानेवारीनंतर ही कार भारतीय रस्त्यावर दिसेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

शहराला मिळणार नवी ओळख
सर्वात स्वस्त कार निर्मिती करणारे शहर म्हणून जगात औरंगाबादची ओळख यामुळे निर्माण होईल. भविष्यात अशा कारची मागणी वाढत असल्याने सप्लायरदेखील अपग्रेड होतील आणि गुंतवणूकदारांना कमी खर्चात मराठवाड्यामध्ये सुविधा मिळू शकतील.

‘बावा’शी एक हजार उद्योजक जोडले जाणार
टु आणि थ्री व्हीलर वाहनांचे सुटे भाग सप्लाय करण्यासाठी सध्या ‘बावा’शी (बजाज अ‍ॅटो व्हेंडर असोसिएशन) बजाज समूहाच्या माध्यमातून जवळपास दोनशे छोटे-मोठे उद्योजक जोडलेले आहेत. कार प्रकल्पाचे काम सध्या प्राथमिक स्तरावर असले तरी दिवाळीपर्यंत जवळपास एक हजार उद्योजक ‘बावा’ शी जोडले जाणार आहेत.

नॅनोला पर्याय : नॅनो कारला पर्याय म्हणून येणा-या या कारची कमर्शियल व बेसिक अशी मॉडेल्स असून दोन्ही मॉडेलमध्ये उंची व रुंदीची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी
मराठवाड्यात उद्योग क्षेत्राला या कारनिर्मिती प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळणार असून सुमारे पाच हजार कामगारांना रोजगार मिळू शकेल.

रोज 1200 कारची निर्मिती
सध्या रोज 200 कार बनवण्याची क्षमता. मात्र, परदेशात मिळणारा प्रतिसाद पाहता 3 महिन्यांत क्षमता रोज 1200 कारपर्यंत वाढणार.