आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cheating With Government, Charge Fild On 5 Geaning Owners

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासनाची फसवणूक; ५ जिनिंग मालकांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - उपविभागीय अधिका-यांचे बनावट सही व शिक्के व अकृषक परवाना तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जिनिंग मालकांवर सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी सी. एस. कोकणी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोड शहरालगत नगरपालिका व डोंगरगाव ग्रामपंचायत हद्दीत जिनिंग प्रेसिंग काही वर्षांत सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिनिंग प्रेसिंगच्या बांधकामासाठी अकृषक परवान्याची गरज असल्याने दीपक अग्रवाल, मयूर मित्तल, अभिषेक मित्तल (सचिन जिनिंग प्रेसिंग), नवीनकुमार तायल, राम अवतार तायल (शिवम कोटेक्स) या पाच जणांनी व अन्य काही अज्ञातांनी सिल्लोडच्या उपविभागीय अधिका-यांचे बनावट शिक्के व सहीचा वापर करून अकृषक परवान्याचा आदेश तयार केला.

सदरील आदेश शासकीय कार्यालयांमध्ये स्वत:च्या फायद्यासाठी उपयोगात आणून शासनाची फसवणूक केली, अशा प्रकारची तक्रार उपविभागीय अधिकारी सी. एस. कोकणी यांनी सिल्लोड ग्रामीण पाेलिस स्टेशनला २ जून रोजी दिल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सिल्लोड ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक मिलिंद खोपडे हे करत आहेत.

प्रकरण उघडकीस
शाळा-महाविद्यालयांसाठी लागणारी प्रमाणपत्रे तयार करताना टोळीला पाेलिस उपनिरीक्षक सुनीता गाढे यांनी सहा महिन्यांपूर्वी पकडले होते. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची सही व शिक्क्याचा वापर झाल्याचे प्रकरण विधानसभा निवडणूक काळात नगरसेवक सुनील मिरकर यांनी उघडकीस आणले होते. त्यानंतर २ जूनला महसूल विभागाचे प्रकरण उघडकीस आले.

कर्मचा-याच्या लक्षात आले
एनए ४४ ची नोंद घेण्यासंदर्भात तहसील कार्यालयात वरील पाच जणांनी अर्ज केला होता. संबंधित जमीन प्रकरणात दरवर्षी तहसील कार्यालयाकडून दंडासह अकृषक कर भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात येतात. त्यामुळे अशा प्रकरणात एनए ४४ चा परवाना देता येत नसल्याचे कर्मचा-यांच्या लक्षात आले. हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार उपविभागीय अधिका-यांना असल्याने या प्रकरणात परवाना दिला का? अशी तहसीलकडून विचारणा करण्यात आल्याचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने असा परवाना दिला नसल्याचे कळवले. ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

आरोपींनीही केली होती तक्रार
उपविभागीय अधिकारी सी.एस. कोकणी यांनी तक्रार देण्यापूर्वी याप्रकरणी एनए ४४ परवान्यासंदर्भात आपली फसवणूक झाल्याची तक्रार या पाच जणांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी सिल्लोड तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता या तक्रारदारांच्या विरोधात चुन्नीलाल कोकणी यांनी तक्रार दिली व सिल्लोड तालुक्यातील पाच जिनिंग मालकांवरच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जिनिंग मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.