आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांचे व्हॉट्स अप तपासणार, मोर्चादरम्यान शिक्षकांनी फिरवलेले अश्लील मेसेजेस शासनाकडे पाठवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोर्चामध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या ५९ शिक्षकांना अटक केल्यानंतर इतर शिक्षकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकांचे मोबाइल व्हाॅट्सअॅप अकाउंट तपासणे सुरू केले आहे. त्याच्या आधारे फरार शिक्षकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला.
अटकेतील १२ शिक्षकांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून इतर शिक्षक न्यायालयीन कोठडीत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी निघालेल्या प्रत्येक मोर्चाचे पोलिसांच्या विशेष शाखेने चित्रीकरण केले अाहे. त्याआधारे इतर शिक्षकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अटकेतील शिक्षकांच्या मोबाइलमध्ये शिक्षणमंत्र्यांबाबत अनेक आक्षेपार्ह मजकूर असून तो शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. काही शिक्षक कारवाईच्या भीतीने शहराबाहेर असून त्यांच्या नातेवाइकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फक्त ७० शाळा बंद : शिक्षकांच्यामोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक संघटना आणि विविध शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार विनाअनुदानित ७० शाळा वगळता शहरातील इतर सर्व शाळा सुरू होत्या. मात्र विद्यार्थी संख्या कमी होती. तर मुख्याध्यापक संघाने शंभर टक्के शाळा बंदचा दावा केला आहे. दरम्यान विविध संघटनांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लाठीमाराचा निषेध करत निवेदन दिले. शिक्षकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही केली. यात नामदेव सोनवणे, विठ्ठल बदर, दत्ता पवार, प्रकाश इंगळे, आशिष इंगळे, अण्णासाहेब सोनवणे आदींचा समावेश होता.

कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई
शिक्षकांवरील कारवाई कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्यात आली आहे, असे अमितेशकुमार यांनी सांगितले. पोलिसांनी केलेला हल्लादेखील जिवे मारण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. त्यामुळे तसा तक्रार अर्ज दिल्यास चौकशी करून पोलिसांवरही गुन्हा दाखल करू, असे आयुक्तांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...