आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिकलवर पाय पडताच स्फोट; बहीण-भाऊ झाले गंभीर जखमी, रहेमानिया काॅलनीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटात जखमी झालेल्या मुलांना तातडीनेे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. - Divya Marathi
स्फोटात जखमी झालेल्या मुलांना तातडीनेे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
औरंगाबाद - दाट लोकवस्ती असलेल्या आझाद चौक रोडवरील रहेमानिया येथे केमिकलचा स्फोट होऊन दोन चिमुकले बहीण-भाऊ  जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी १०.५० वाजता घडली. वसीम खान छोटे खान (९) आणि इकरा खान हनीफ खान (१०, रा. रहेमानिया कॉलनी, गल्ली नं. ६) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह एटीएस आणि राज्य गुप्तचर वार्ता विभागाने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.  
 
वसीम आणि इकरा दोघे दूध आणण्यासाठी रहेमानिया काॅलनीतील चौकात गेले होते. दुधाची पिशवी घेऊन परत जाताना फैजान स्क्रॅप सेंटर, साहिल बॅटरीच्या समोर येताच वसीमचा पाय एका छोट्याशा केमिकलने भरलेल्या कॅरीबॅगवर पडला आणि स्फोट झाला.  यात वसीमच्या डाव्या पायाची टाच पूर्णपणे फाटली, तर इकराच्या  पायालाही गंभीर जखम झाली.  एकापाठोपाठ असे दोन आवाज आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. आवाज ऐकताच लोक जमा झाले.
 
अली खान या रिक्षाचालकाने जखमी मुलांना रिक्षात बसवले. तसेच याच भागातील फर्निचर व्यावसायिक इसाक खान युसूफ खान, अब्दुल आलिम यांनी या दोघांनाही तत्काळ अमान हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती कळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त राहुल श्रीरामे, संदीप आटोळे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, ज्ञानोबा मुंढे, गोवर्धन कोळेकर, चंपालाल शेवगण, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, सुरेश वानखेडे, अविनाश आघाव, मधुकर सावंत,  निरीक्षक जैस्वाल यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांच्यापाठोपाठ बॉम्बशोधक नाशक पथक, एटीएस आणि फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञही आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.  

...और मैं धडाम से गिरा
जखमी मुले लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता चौथीत शिकतात. शुक्रवारपासून त्यांच्या शाळेला सुट्या लागल्या आहेत. आईने त्यांना दूध आणायला सांगितले होते. याबाबत वसीमला विचारले असता, तो म्हणाला, मैं दुकानासे आर रहा था. मेरे पैर के निचे कुछ तोभी आया और मैं जमीनपर गिर पडा. वसीमची जखम पूर्ण बरी होण्यासाठी किमान दीड महिना लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी पडेगाव येथील मदरशात मोबाइल बॅटरीचा स्फोट होऊन दहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता.   

फटाक्याच्या स्फोटाने मुलगा भाजला   
एकीकडे  शहरातील रहेमानिया कॉलनीत स्फोट झाल्याची माहिती समजताच शहरातील संपूर्ण पोलिस यंत्रणा तत्काळ अलर्ट झाली. जखमी घाटीत येतील म्हणून काही पोलिस कर्मचारी घाटीतही पोहोचले होते. दरम्यान, फटाक्याच्या स्फोटाने जखमी झालेला सात वर्षांचा मुलगाही घाटीत उपचारासाठी आला होता. अनिकेत संजय रोडगे (रा. पंडित कॉलनी, भावसिंगपुरा) अंगणात खेळत असताना कचऱ्यामध्ये त्याला फटाका सापडला. तो पेटवण्याच्या प्रयत्नात फटाका फुटला आणि त्याच्या उजव्या हाताचा पंजा पूर्णपणे फाटला.

पुढील स्‍लाइडवर वाचा, स्फोटामागे या असू शकतात शक्यता...
बातम्या आणखी आहेत...