आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर होईल शहराचाही कायापालट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्र वैर्‍याची आहे. कधीही, कोणत्याही क्षणी शत्रूचा हल्ला होऊ शकतो. त्यांना थोपवण्याची जबाबदारी आमच्या खांद्यांवर आहे. ‘अखंड असावे सावधान’ हेच आमचे ब्रीद असून युद्ध असो वा नसो आम्ही कायम सज्ज असतो, अशा शब्दात औरंगाबादच्या लष्करी छावणीतील जवान व अधिकार्‍यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिस्तीने कठोर असले तरी ते मनाने खूपच हळवे आहेत..डीबी स्टार चमूने या छावणीत अख्खा दिवस घालवला तेव्हा याचाच प्रत्यय आला.
औरंगाबादेत ब्रिटिश काळापासून लष्कराचा तळ आहे. निझामाने ब्रिटिशांची तैनाती फोज स्वीकारली होती. त्यामुळे हैदराबाद हे संस्थान झाले आणि ब्रिटिशांची मोठी छावणी शहरात आली. हे दक्षिण भारतातील महत्त्वाचे ठाणे होते. निझामी राजवट संपल्यानंतर या छावणीत भारतीय लष्कराचा ताबा आला. अनेक वष्रे लष्करातील कारकून पदावरील कर्मचार्‍यांना लागणारे प्रशिक्षण देण्याची शाळा (अँक्ट्स) येथे सुरू होती. 1982 मध्ये येथे सध्या असलेली आर्टिलरी ब्रिगेड आली. लष्कराच्या जीवनाबाबत सर्वसामान्य नागरिकांना (लष्करी भाषेत सिव्हिलियन्स) प्रचंड आकर्षण असते. 66 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डीबी स्टारने लष्कराच्या छावणीत एक दिवस घालवला आणि येथील सैनिकांतील संवेदनशील माणूस बघायला मिळाला. वेळप्रसंगी वज्राहून कठीण होणारे जवान व अधिकारी किती प्रत्यक्षात किती हळव्या मनाचे आहेत, हे यावेळी पाहायला मिळाले.
स्वच्छ सुंदर परिसर : औरंगाबाद शहरातून दौलताबादकडे जाताना लष्करी छावणीचा परिसर लागताच स्वच्छ शहराचा प्रत्यय येतो. कोठेही कचरा नाही, काळ्याभोर डांबरी रस्त्यावर कोठेही खड्डा नाही की घाण नाही. त्यावर पांढर्‍या रंगाने मार्किंग केलेले लक्षवेधी पट्टे मनात भरतात. ठिकठिकाणी वाहतुकीला दिशा दाखवणारे आणि 24 तास उभे असणारे जवान येथे नेहमीच बघायला मिळतात. दूरवरून आपण नेहमीच हे सुंदर चित्र बघतो. आमच्या चमूने प्रत्यक्ष छावणीत जाऊन या परिसराची पाहणी केली तेव्हा शहर कसे असावे याचा परिपाठच तेथे पाहायला मिळाला.
नेमके काय आहे छावणीत?
लष्करी शिस्त वगळता या छावणी परिसरातून सामान्य माणसाला खूप काही शिकण्यासारखे आहे. हे सैनिक रोज पहाटे 4 वाजता उठतात. संपूर्ण परिसर टापटिप ठेवण्याचे काम त्यांचेच आहे. तेथे महापालिकेसारखे वेगळे प्रशासन नाही. आपली कामे आपणच करायची या त्यांच्या सवयीमुळे हा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक आहे.
पॉलिथीन फ्री झोन : या परिसरात प्रवेश करताच ठिकठिकाणी पॉलिथीन फ्री झोनचे फलक लागलेले दिसतात. या फलकाच्या पुढील भागात कोठेही पॉलिथीनची बॅग किंवा कागदाचा तुकडा दिसत नाही. या परिसरात पॉलिथीनच्या वापरावर कडक बंदी आहे. लष्करी जवानांसोबतच बाहेरच्या लोकांनाही येथे पॉलिथीन वापरता येत नाही.
हेल्मेट सक्तीचे 100 टक्के पालन : मुख्य प्रवेशद्वारातून मोटारसायकलवर प्रवेश करण्यासाठी हेल्मेट सक्तीचे आहे. चालकासोबतच मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागते. हा नियम लष्कराबाहेरच्या लोकांनाही लागू आहे. विना हेल्मेट वाहन चालवणार्‍या लष्करी व्यक्तीच्या सीआरमध्ये याची नोंद केली जाते. यामुळे त्याच्या पुढील बढतीवर परिणाम पडतो.
डासांवर नियंत्रण : हिरवीगार झाडी अन् लॉन या संपूर्ण भागात आहे. तरीही येथे एकही डास नाही. याचे क ारण म्हणजे झाडे व गवतांची नियमित कापणी केली जाते व त्यावर औषधांची फवारणी केली जाते. त्यामुळे इतकी झाडी असूनही नावालादेखील डास दिसत नाही. डास चावून मलेरिया, डेंग्यू असे रोग होऊ नयेत म्हणूनच ही खबरदारी घेतली जाते.
रेन वॉटर हॉर्वेस्टिंग : छावणीत पाण्याची खूप काळजी घेतली जाते. पाणीटंचाई दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करण्यापेक्षा अतिशय ठोस उपाय त्यांनी शोधला आहे. यासाठी तब्बल तीन एकर जागेवर रेन वॉटर हॉर्वेस्टिंगचा प्रकल्प राबवण्यात आला आहे. हे पाणी केवळ डबके करून साचवण्यात आले नसून ते जमिनीत झिरपून जमिनीतील जलसाठा वाढावा यासाठी उपयुक्त ठरावे अशीच ही योजना करण्यात आली आहे. छावणीतील हिरवळीचे हेच रहस्य आहे.
कुटुंबालाही देतात वेळ : लष्करी जवानांनाही मन असते. त्यांनाही सामान्य नागरिकांसारखेच जगावेसे वाटते. देश रक्षणाचे महान काम करत असताना ते आपल्या कुटुंबीयांसाठी देखील वेळ देऊन काही उपक्रम राबवतात. यात संगणक प्रशिक्षण, इंग्रजी संभाषण वर्ग, लहान मुलांसाठी बालवर्ग तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा तयारी वर्ग चालवले जातात.
10 हजार वृक्ष लावण्याचा संकल्प : क ारगिल विजय दिनाच्या निमित्ताने छावणीतील सैनिकांनी तब्बल 10 हजार वृक्ष लावून ते जगवण्याचा संकल्प केला आहे. पहिल्या दिवशी यातील एक हजार वृक्षे लावण्यात आली. टप्प्याटप्प्याने इतर वृक्ष लावायला सुरुवात झाली आहे.
तंदुरुस्तीसाठी सर्वकाही : सैनिक म्हटले की व्यायामाने कसलेले शरीर डोळ्यासमोर येते. नियमित कसरतींसोबतच शरीर पिळदार करण्यासाठी येथे अद्ययावत जिम आहे. शहरातील एकमेव गोल्फ कोर्ट येथे आहे. भव्य जलतरण तलाव, स्क्व्ॉश क्लब जवानांना तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. येथील हिरवळ वर्षभर बघायला मिळते. तसेच आधुनिकतेची क ास धरत इंटरनेट कॅफे, एसबीआय आणि अँक्सिस बँकेचे एटीएम सेंटर, एसबीआयची शाखा यासह सैनिकांच्या पत्नींसाठी ब्युटी पार्लरही येथे उपलब्ध आहे.
3 हजार सैनिकांचा ताफा - औरंगाबादची लष्करी छावणी तब्बल 300 एकर जागेवर पसरलेली आहे. येथे अधिकारी आणि जवान मिळून 3 हजार सैनिक देशासाठी सेवा बजावतात. त्यांना राहण्यासाठी 500 निवासस्थानांची सुविधा आहे, तर अधिकार्‍यांसाठी बंगले आहेत. या ठिकाणी कुटुंब घेऊन राहता येते.
ब्रिगेडियर आहेत प्रमुख - या ठिकाणी ब्रिगेडियर हे सर्वात मोठे पद आहे. त्यांच्या अखत्यारीत छावणीचे कामकाज चालते. ब्रिगेडियर म्हणून सुरेंद्र पावामनी हे काम पाहत आहेत. त्यानंतर कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट असा अधिकार्‍यांचा पदक्रम आहे. यानंतर ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर या अंतर्गत हॉनररी कॅप्टन, लेफ्टनंट कॅप्टन, सुभेदार मेजर, सुभेदार, नायब सुभेदार असा पदक्रम आहे. यानंतर हवालदार, नाईक, शिपाई असा पदक्रम आहे.