आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिकागोच्या प्राध्यापकाची जमीन पित्याने हडपली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अमेरिकेत नोकरी करणार्‍या प्राध्यापकाने आपली औरंगाबादेतील दीड एकर जमीन पित्याने आणि भाऊ-बहिणीनेच हडपल्याची तक्रार पोलिसांकडे केली असून सुमारे साडेचार कोटी रुपये किमतीची ही जमीन परत मिळवून द्यावी, अशी विनंती केली आहे. पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या आदेशानंतर वडील, भाऊ, बहीण आणि जावयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद रझियोद्दीन सय्यद अनिसोद्दीन (66, ह. मु. प्लॉट नं. 27/ ए, नागसेन कॉलनी, रोशनगेट) असे या प्राध्यापकाचे नाव आहे. अमेरिकेच्या शिकागोमधील डेली महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. सय्यद रझियोद्दीन यांनी जैवरसायनशास्त्रात पीएचडी केल्यानंतर ते पुढील उच्च शिक्षणासाठी जपानला गेले. तेथील शिक्षण पूर्ण होताच नोकरीनिमित्त 1980 मध्ये ते सौदी अरेबियात गेले. तेथे नोकरी लागल्यानंतर गुंतवणूक म्हणून त्यांनी 1984 ते 85 मध्ये बीड बायपास रोडवरील ईटखेडा येथील गट क्र. 82 मध्ये तीन टप्प्यांत 64 गुंठे (दीड एकर) जमीन खरेदी केली. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 4.5 कोटी आहे. नोकरीनिमित्त सौदी अरेबियातच राहावे लागणार असल्याने त्यांनी या जमिनीची देखभाल व पाहणीचे अधिकार पिता सय्यद अनिसोद्दीन जान मोहंमद आणि धाकटा भाऊ सय्यद मुबारेसोद्दीन उर्फ रफत सय्यद अनिसोद्दीन यांना दिले. यानंतर ते अमेरिकेतील शिकागो येथेच स्थायिक झाले.

रझियोद्दीनची कोर्टात धाव
रझियोद्दीन शिकागोमध्ये स्थायिक झाल्याने वडील अनिसोद्दीन आणि भाऊ मुबारेसोद्दीन (रफत) यांनी या जमिनीचे तीन हिस्से केले. बनावट कागदपत्रांच्या आधारे बहीण सफिया आरा अब्दुल कादरी (रा. दिल्ली गेट) हिच्या नावे 20 गुंठे, यास्मिन अब्दुल माजीद (रा. ईटखेडा) हिच्या नावे 20 गुंठे, तर अनिसोद्दीन यांनी स्वत:च्या नावे 24 गुंठे जमीन करून घेतली. यानंतर काही दिवसांनी अनिसोद्दीन यांनी बक्षीसपत्र (हिबानामा) तयार करून 24 गुंठे जमीन धाकटा मुलगा मुबारेसोद्दीन याच्या नावे केली. रझियोद्दीन यांच्या नावे असलेली आणखी 330.26 चौरस मीटर जागा अनिसोद्दीन यांनी जावई अब्दुल माजीद अब्दुल अजीज (रा. बन्सीलालनगर) याच्या नावे केली. 27 डिसेंबर 2011 रोजी रझियोद्दीन औरंगाबादेत आले. सातबार्‍यावरील नाव गायब झाल्याचे पाहून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.


‘तक्रार खोटी, फिर्यादीच्या सांगण्यावरूनच फेरफार’
मुख्यमंत्र्यांकडे केली होती पीएचडीसाठी शिफारस
रझियोद्दीन यांनी 1976 मध्ये एम.एस्सी केले असून, मुंबईमध्ये पीएच.डी केली आहे. पीएच.डीला नंबर लागावा म्हणून काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या माझ्या वडिलांनीच तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे शिफारस केली होती, असे रफत यांनी सांगितले.


पोलिस आयुक्तांकडे कैफियत मांडली
रझियोद्दीन यांनी आयुक्त संजयकुमार यांची 19 ऑगस्ट रोजी भेट घेऊन पाच जणांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी रझियोद्दीन यांची तक्रार नोंदवत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पुरावे गोळा करत आहे
सय्यद रझियोद्दीन यांनी पित्यासह भाऊ-बहीण आणि जावयाने जमीन हडपल्याची तक्रार दिली आहे. आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. रझियोद्दीन यांनी त्यांचा मालकी हक्क असल्याची सर्व कागदपत्रे दिली असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. प्रल्हाद जाधव, पोलिस उपनिरीक्षक, सातारा ठाणे.

तक्रार धादांत खोटी
वडील 91 वर्षांचे असून ते स्वत:च्याच मुलाची फसवणूक कशी काय करू शकतील ? ही जमीन वडिलांनीच खरेदी केली आहे. आम्हाला नऊ बहिणी असून त्यापैकी दोघींनी त्याला फसवणुकीची तक्रार देण्यास भाग पाडले. तो येथे आल्यास सर्व जमीन देऊ. सय्यद रफत, तक्रारकर्त्याचा धाकटा भाऊ.