आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या हवाई दौऱ्याने झाली धावपळ, कोणी विमानतळावर गेले तर कोणी गाठले पैठण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगाबाद जालना जिल्ह्यांच्या एक दिवसाच्या हवाई दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली. मुख्यमंत्र्यांना घेण्यासाठी विमानतळावर जावे की पैठणच्या कार्यक्रमास हजर राहावे, असा प्रश्न अनेकांना पडला. मोजके नेते, कार्यकर्त्यांनी विमानतळ गाठले, तर विमानतळाचा पास मिळणे अवघड असल्याने अनेकांनी पैठणच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांचे ‘मुखदर्शन’ घेण्यासाठी सकाळीच पैठण जवळ केले.

मुख्यमंत्र्यांचे विशेष विमानाने सकाळी साडेनऊ वाजता चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. तेथून ते लगेच हेलिकॉप्टरने पैठणकडे रवाना होणार होते. त्यांच्या स्वागतासाठी येथे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, संजय केणेकेर अशी मोजकीच मंडळी हजर होती. विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गेलो तर पैठणच्या कार्यक्रमाला पोहोचणे शक्य होणार नाही, याची जाणीव असल्याने जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोटारीने पैठणला रवाना झाले.

काही कार्यकर्त्यांनी सकाळी विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जाण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाल्याने नंतर ते मोटारीने पैठणकडे रवाना झाले. मात्र या रस्त्याची अवस्था, वाहतुकीची वर्दळ यामुळे ही मंडळी पैठणला पोहोचेपर्यंत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर जालन्याकडे उडाले होते. सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टरने चिकलठाणा विमानतळावर आले. तेथून ते विमानाने मुंबईकडे रवाना होणार होते. तेव्हा निम्म्या कार्यकर्त्यांनी पुन्हा विमानतळ जवळ केले. तेथे मात्र मुख्यमंत्री कोणालाच भेटले नाहीत. त्यामुळे हे कार्यकर्ते हिरमुसले.

आसुसलेले हिरमुसले
सरकारमधीलभाजपच्या कोणत्याही मंत्र्याचा औरंगाबाद दौरा असले की भाजपचे कार्यकर्ते ‘महामंडळांवरील नियुक्त्यांचे काय झाले?’ असा सवाल करतात. या वेळी दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच येथे येत असल्याने अनेकांनी निवेदनेही तयार ठेवली होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी अशांना वेळेच दिला नाही. आसुसलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आणि ते परत आले.

कार्यकर्त्यांची दांडी
दरम्यान, भाजपमधील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे गटा-तटाच्या कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याचेही समोर आले. काही पदाधिकारी मुद्दाम दुपारी महानगरपालिकेत फिरकले तर काहींनी अन्य जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली. विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा ग्रामीण भागाचा असल्याचा युक्तिवाद काही पदाधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबादपेक्षा जालना जिल्ह्याला जास्तीचा वेळ दिला. तसेच तेथील कार्यकर्त्यांनाही वेळ दिल्याचा राग येथील कार्यकर्त्यांच्या मनात स्पष्ट जाणवत होता. काहींनी तशी नाराजीही व्यक्त केली, तर काहींनी सायंकाळी विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाता आपला राग इतरांपर्यंत पोहोचवला. विशेष म्हणजे नेहमी मुख्यमंत्र्यांसमवेत राहणारे काही पदाधिकारीही या दौऱ्याच्या वेळी अलिप्त राहिले.