आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची घोषणा ‘बाजारात तुरी’ ; औरंगाबादकरांना मदत निधी मिळणार उशीरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील साखळी बंधारे, हर्सूल तलाव परिसराच्या सुशोभीकरणासाठी दहा कोटींचा निधी देण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा म्हणजे ‘बाजारात तुरी’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. निधी मिळण्यासाठी आणखी किमान दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत पावसाळा सुरू होईल आणि बंधा-यांची कामे पुढील वर्षीच होऊ शकतील, अशी स्थिती आहे.


दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौ-यावर आले. त्यांनी जायकवाडी व हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत साखळी बंधा-यांच्या बांधणीसाठी 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे जाहीर केले. त्यासोबत हर्सूल तलाव परिसराच्या सुशोभीकरणाकरिता दोन कोटी महापालिकेला देणार आहे, असेही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा करण्यापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली असेल. कदाचित ही रक्कम जिल्हा प्रशासन, महापालिकेच्या तिजोरीत तातडीने जमा करण्याचे आदेश देऊनच ते औरंगाबादला आले असतील, असे वाटले होते.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांनी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत या दहा कोटींचे दोन स्वतंत्र प्रस्ताव सादर होतील. त्याला मंजूरी मिळाल्यावर त्याचे शासन आदेशात (जीआर) रुपांतर होईल. मग वित्त विभागामार्फत निधी वितरित केला जाईल. लघु पाटबंधारे विभागामार्फत बंधारे बांधण्यासाठी निविदा मागविल्या जातील. त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होऊ शकते. या सर्व प्रक्रियेस किमान दोन महिने लागू शकतात. मनपाच्या निविदा प्रक्रियेची पद्धत आणि अतिक्रमण हटाव मोहीमेला होणारा विरोध लक्षात घेता हर्सूल सुशोभीकरणाचे काम सुरू होण्यास किमान दीड वर्ष लागू शकते, असेही सांगण्यात आले.


अजून पत्रच नाही
या संदर्भात दिव्य मराठी प्रतिनिधीने माहिती घेतली असता ती केवळ घोषणाच होती असे स्पष्ट झाले. 10 कोटींच्या तरतुदीचे कोणतेही पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले नाही, असे स्पष्ट झाले. अप्पर जिल्हाधिकारी किसन लवांदे म्हणाले की, अद्याप लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. मनपाकडेही अशीच स्थिती असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.