औरंगाबाद - गत महिनाभरापासून शहर पोलिसांची लगीनघाई सुरू आहे. पाहुण्यांचे आदरातिथ्य यथास्थित व्हावे यासाठी सुमारे तीन हजार पोलिस अधिकारी कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. ही धावपळ आहे शहरात सुरू असलेल्या २९ व्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी. मंगळवारी (१० जानेवारी) संध्याकाळी सहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकूळ मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, दीपक केसरकर, महासंचालक सतीशचंद्र माथूर यांची प्रमुख उपस्थिती असेल. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बॉलीवूड कलाकारांना खास आमंत्रण देण्यात आले असून सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा होईल. दरम्यान, १२ जानेवारी रोजी सातारा परिसरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण मैदानावर समारोपाचा सोहळा होणार आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव केला जाणार आहे.
सोमवारी रंगीत तालीम : सगळ्यागोष्टी सुरळीत पार पडाव्यात याकरिता सोमवारी रंगीत तालीम करण्यात आली. मुख्यमंत्री विमानतळापासून कसे येतील, त्या वेळी कसा बंदोबस्त असेल, याची पाहणी करण्यात आली. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमाचीही रंगीत तालीम घेण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक निसार तांबोळी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याच्या आयोजनात गुंतले आहेत. पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर हेदेखील सोमवारी दुपारी शहरात दाखल झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
उद्या वाहतुकीत बदल
बुधवारी पहाटे ते सकाळी १० दरम्यान पाच किलोमीटर धावण्याची स्पर्धा होणार अाहे. पोलिस आयुक्तालय, मिल कॉर्नर, ज्युबिली पार्क, भडकल गेट, आमखास मैदान, किलेअर्क, रंगीन गेट, अण्णाभाऊ साठे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, गणेश कॉलनी, सलीम अली सरोवर, एन-१२ स्टॉप, टीव्ही सेंटर चौक, श्रीकृष्णनगर, आयपी मेस असा स्पर्धेचा मार्ग असून या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.