आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Laid Down Stone Of Haj House, Vande Matram Hall

हज हाऊस, ‘वंदे मातरम्’चे भूमिपूजन मुख्‍यमंत्री करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वंदे मातरम् सभागृह आणि त्याला लागूनच प्रस्तावित करण्यात आलेल्या हज हाऊस या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 17 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा अधिकृत झाला नसला तरी जिल्हा प्रशासनाकडून या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळेच गेल्या चार दिवसांपासून हज हाऊसच्या नियोजित जागेवरील बांधकामे खाली करून जागा ताब्यात घेण्यात आली आहे.


गेल्या 30 वर्षांपासून वंदे मातरम् सभागृहासाठी आंदोलन सुरू होते. या सभागृहाचे भूमिपूजनही पार पडले होते. मात्र ते काही झाले नाही. त्यातच गेल्या काही वर्षांपासून शहरात हज हाऊस असावे, असा मतप्रवाह सुरू झाला. जागा उपलब्ध असल्यामुळे ही दोन्ही सभागृहे शेजारीच होतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तेव्हापासून या दोन्ही प्रकल्पांची चर्चा सुरू आहे. निवडणुकीपूर्वी दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन होईल, असे संकेत देण्यात आले होते. याला काही जणांना फाटा देण्याचाही प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात कारवाई योग्य दिशेने सुरू होती. नियोजित जागेवर असलेली 53 बांधकामे हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मालमत्ताधारकांना पडेगाव परिसरात भूखंड आणि प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार भूखंड आणि 1 लाख रुपये देण्यात आले असून उर्वरित रक्कम ते स्थलांतरित झाल्यानंतर देण्यात येणार आहे.


जागा मोकळी होत असतानाच प्रशासनाच्या वतीने भूमिपूजनाची तयारी करण्यात येत आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी येणार्‍या खर्चाची तरतूद राज्याच्या अंदाजपत्रकात करण्यात आली असून ती संबंधित विभागाच्या हवालीही करण्यात आली. सिडकोच्या वतीने हे काम करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन होईल.