आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समांतर'ला मुख्यमंत्र्यांची बगल, युतीच्या प्रचारार्थ फडणवीसांची सिडकोत सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुन्हा युतीच्या ताब्यात सत्ता दिल्यास सिडकोतील नागरिकांना मालमत्तांचा मालकी हक्क देण्यासोबत (लीज होल्डचे फ्री होल्ड) गुंठेवारीला मुदतवाढ देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत शनिवारी (१८ एप्रिल) दिले. शहरातील रस्त्यांसाठी दिलेले २५ कोटी रुपये हे ट्रेलर होते. सत्ता आल्यानंतर रस्त्यांची कामे करण्याची जबाबदारी माझीच असेल. मी नागपूरपेक्षाही औरंगाबाद शहरावर जास्त प्रेम करेल, असेही ते म्हणाले. मात्र, औरंगाबादकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या समांतर जलवाहिनीच्या मुद्द्याला त्यांनी सोयीस्कर बगल दिल्याने भाजप समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सभेकडे फिरकले नाही, यावरूनही भाजपच्या गोटात उलटसुलट चर्चा सुरू झाली.

युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जयभवानीनगरातील शिवाजी चौकात सभा झाली. या वेळी पालकमंत्री रामदास कदम, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला फ्री होल्डचा मुद्दा आम्ही तातडीने मार्गी लावू. त्याचबरोबर गुंठेवारीतील मालमत्ता अवैध राहणार नाहीत याचीही खबरदारी घेऊ. गुंठेवारीसाठी गठित केलेल्या समितीचा अहवाल आम्ही स्वीकारला आहे. लवकरच त्याचे कायद्यात रूपांतर केले जाईल. डीएमआयसीच्या निमित्ताने शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी केंद्राकडून आणखी साडेतीन हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहराचा चेहराच बदलून जाईल. जिल्ह्याला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला असून जपानच्या मदतीने लेण्यांचाही विकास केला जाईल व त्यांचे जागतिक पातळीवर मार्केटिंग केले जाईल. तुम्ही मला औरंगाबादच्या सत्तेची किल्ली द्या, मी राज्याच्या तिजोरीची किल्ली तुमच्याकडे देतो, असेही ते म्हणाले.

भाषणाच्या अखेरीस मुख्यमंत्री समांतरविषयी भाजपची भूमिका स्पष्ट करतील, पाणी मिळण्यापूर्वी सुरू असलेली पाणीपट्टी वसुली अन्यायकारक असल्याचे म्हणतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी याबद्दल अवाक्षरही काढले नाही. या वेळी कदम, खैरे, लोणीकर यांची भाषणे झाली.

कांेडी झाली, भूत उतरवलेच नाही
शिवसेनेसोबत युती घोषित होण्यापूर्वी म्हणजे दोन एप्रिल रोजी श्रीहरी पॅव्हेलियन येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबादच्या डोक्यावर चढलेले समांतरचे भूत उतरवून टाकू, असे आश्वासन दिले होते. मात्र, युतीमुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांचीही कोंडी झाली. शनिवारी जयभवानीनगर चौकात झालेल्या सभेत त्यांना समांतरविषयी एकही शब्द बोलता आला नाही. खासदार चंद्रकांत खैरे मुख्यमंत्र्यांसोबत बोलत असताना त्यांच्याकडे पाहत असताना लोणीकरांच्या नजरेत कोंडीबद्दल खेदच व्यक्त होत असावा.

पाय मुडपला म्हणून...
उमेदवारांची निवड झाल्यापासून प्रचाराची जबाबदारी असलेल्या पंकजा मुंडे आज शहरात आल्या. मात्र, विविध भागांतील पदयात्रांकडे फिरकल्याही नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही त्या येणार नसल्याची चर्चा होती, परंतु त्या आल्या. माझा पाय मुडपला असल्याने मी येऊ शकले नव्हते, असा खुलासा त्यांनी भाषणात केला व दुसरे काम असल्याचे सांगत निघून गेल्या.

दानवेंचा सभेला चकवा
दरम्यान, मुख्यमंत्री शहरात असतानाही प्रदेशाध्यक्ष दानवे सभेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये दुफळी नव्हे, तिफळी माजली असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. दानवे शेजारी जालना जिल्ह्यातच होते. तरीही ते प्रचाराला का आले नाहीत, यावर उपस्थित नेत्यांनी काहीही भाष्य केले नाही.