आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chief Minister Prithviraj Chavan Not Given Any Answer On Jayakwadi Water Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांचा काढता पाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडावे लागू नये म्हणून ते नगर जिल्ह्यातच कालव्यांद्वारे वळवले जात असल्याचा प्रश्न उपस्थित होताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे पत्रकार प्रश्न उच्चारत असतानाच पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उठण्याची सूचना केली आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी उठून उभे राहत त्यांना साथ दिली. त्यामुळे ‘नंतर बोलू, बोलतो’ असे तीन वेळा सांगून मुख्यमंत्री दालनाबाहेर गेले.

सकाळी औरंगाबादेत आगमन झाल्यानंतर चव्हाण यांनी विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृहाच्या कामाबाबत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. या वेळी थोरात, दर्डा, आमदार अब्दुल सत्तार, नवनिर्वाचित आमदार सुभाष झांबड उपस्थित होते.


नगर जिल्ह्यात कालव्यांतून जायकवाडीकडे येणारे पाणी अडवले जात आहे. हक्काचे पाणी कधी मिळणार, असा प्रश्न येताच मुख्यमंत्री चव्हाण थोडे अडखळले. त्याच वेळी उजव्या बाजूला बसलेल्या थोरात यांनी निघण्याची सूचना केली तर डाव्या बाजूने असलेले दर्डा स्वत: उठून उभे राहिले. त्यामुळे या विषयावर नंतर बोलू, असे सांगून विषय संपवला. पत्रकारांकडून तीन वेळा तोच प्रश्न आला आणि तिन्ही वेळा मुख्यमंत्र्यांचे उत्तर तेच होते.

गृहमंत्री पाटील सक्षम
अंधश्रद्धा विरोधी समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि त्यापाठोपाठ मुंबईत छायाचित्रकार तरुणीवर झालेला बलात्कार या घटना पुरोगामी महाराष्‍ट्राला काळिमा फासवणा-या असल्या तरी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दोष देता येणार नाही, ते सक्षम असून पोलिसांचे बळ वाढवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.

... आणि ताफा रवाना
पाणीप्रश्नावर बोलणे का टाळता, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला खरा, पण तोपर्यंत चव्हाण विभागीय आयुक्तांच्या दालनाबाहेर पडले होते. पत्रकार पाठलाग करतील या भीतीपोटी थोरात आणि दर्डा यांनी चव्हाण यांना तातडीने मोटारीत बसवले अन् पुढील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा रवाना झाला.