आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री म्हणाले होते, ‘थोडे थांबा, मनपा आयुक्तांची बदली करतो’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; १२लाखांच्या औरंगाबाद शहराचे मनपा आयुक्त हटवण्यावरून राज्यात सत्ताधीश असणाऱ्या भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर जोरदार रस्सीखेच झाल्याचे आता समोर आले आहे. एकनाथ खडसे यांचा विरोध प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आग्रह अशा कात्रीत सापडल्यावर हे प्रकरण अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. त्यांनी १९ ऑक्टोबरच्या रात्री भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली.
आयुक्त नकोच असतील तर दोन दिवसांत बदली करतो, थोडे थांबा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून पाहिले. पण रामदास कदम यांनी एमआयएमला जवळ करून गोची केल्याने माघार घेतल्यावर होऊ शकणारी नाचक्की दिसत असल्याने पदाधिकाऱ्यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितल्यावर फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला.

आयुक्त हटाव प्रकरणात सर्वात आधी पुढाकार घेणाऱ्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आयुक्त महाजनांच्या बाजूने जोर लावल्याने मोठी अडचण झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध एकनाथ खडसे असा संघर्ष आयुक्तांवरून निर्माण झाला. जसजशी अविश्वास प्रस्तावाची तारीख जवळ येत होती तसतशी मनपातील भाजप पदाधिकाऱ्यांना तोफेच्या माऱ्याला तोंड द्यावे लागत होते. एक तर या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या शहरातील बड्या नेत्यांना विश्वासात घेतल्याने त्यांचा संताप झाला होता. थेट प्रदेशाध्यक्षांकडून हिरवा कंदील आणल्यानंतर तर हा त्रास अधिकच वाढला. खडसे यांनी लक्ष घातल्याने त्यांच्याकडून येणारे निरोप समजावणीची भाषा, दुसरीकडे मनपाबाहेरील नेत्यांची आगपाखड असे नाट्य रंगले. तिकडे मुंबईतही खडसे दानवे यांच्यात एकमत झाल्याने तिढा शेवटच्या क्षणापर्यंत वाढत गेला. नगरविकास मंत्रालय सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावरही हा पेच टाकण्यात आला होता. त्यांचे विरोधक खडसे यात असल्याने प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी यात फारसे लक्ष घालणे टाळले होते, पण आता अविश्वास ठराव काही तासांवर येऊनही तिढा सुटत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या वादात एंट्री केल्याची माहिती हाती आली आहे.

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ ऑक्टोबरच्या रात्री फडणवीस यांनी मनपातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कारभाराचा पाढा वाचला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना एवढ्या तक्रारी असतील तर मी दोन दिवसांत महाजनांची बदली करतो. तोपर्यंत थांबा, असे सांगितले. यावर पदाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. तिकडे शिवसेनेने भाजपचा निर्णय होत नसल्याने एमआयएमला आपल्या बाजूला वळवत आकडा भक्कम केला.

भाजपने आता माघार घेतली तर नाचक्कीशिवाय पदरी काही पडणार नाही याची खात्री या पदाधिकाऱ्यांना होती. त्यांनी धीर करून फडणवीस यांना थोडक्यात आपली अवस्था सांगत ‘साहेब, आता थांबण्याची वेळ निघून गेली. ठराव आणावाच लागेल, नसता अडचण होईल,’ असे स्पष्ट केले. त्यावर थोडा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना ‘गो अहेड’ असे सांगत हिरवा कंदील दिला. त्यानंतर तासाभरातच भाजपने आपण अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनेच व्हीप काढणार असल्याचे शिवसेनेच्या धुरीणांना कळवून टाकले. त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...