आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झांबडांसाठी थांबली मुख्यमंत्र्यांची गाडी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डांना सोबत घेऊन निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी टाटा सफारी अचानक थांबवली. ‘अरे, नवे आमदार कुठे आहेत’, अशी विचारणा त्यांनी केली आणि नवनिर्वाचित आमदार सुभाष झांबड यांना मुख्यमंत्र्यांसोबत खास सफरीचा आनंद मिळाला.


विभागीय आयुक्तालयात आयोजित बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी (23 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता मुंबईहून चिकलठाणा विमानतळावर आले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी दर्डा, आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे, विक्रम काळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी आमदार नितीन पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, जे. के. जाधव, महापौर कला ओझा, माजी मंत्री अशोक पा. डोणगावकर आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री डी. पी. सावंतही होते. विमानतळाच्या मुख्य इमारतीमध्ये नेते मंडळींनी मुख्यमंत्री चव्हाण यांचे हारतुरे घालून स्वागत झाले. ते स्वीकारून मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी टाटा सफारीत चालकाशेजारी बसले. मागील आसनावर थोरात, दर्डा बसले. झांबड सत्तार यांच्याशी गप्पांत दंग होते. मुख्यमंत्र्यांच्या मागच्या ताफ्यात ते जाणार होते. तेवढय़ात मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांकरवी त्यांना बोलावणे पाठवले. त्यांच्यासाठी थोरात, दर्डांनी आसनावर जागा तयार केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा रवाना झाला. शिवसेनेकडून मतदारसंघ खेचून आणणार्‍या झांबडांचा मुख्यमंत्र्यांनी असा सन्मान केल्याने त्यांचे सर्मथक सुखावले.