आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवर्जून भेट द्यावे असे चिखलदरा पर्यटनस्थळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांपैकी एक असलेले आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आता राज्यभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचीवर वसलेल्या चिखलदऱ्यातील निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. या पर्यटनस्थळाला दरवर्षी दीड लाखावर पर्यटक भेट देतात.

पांडव चौदा वर्षे वनवासात असताना त्यांनी येथे काही काळ वास्तव्य केले होते, अशी अाख्यायिका आहे. यादरम्यान त्यांनी कीचक राक्षसाचा वध करून रक्ताने माखलेले हात ज्या कुंडात धुतले तो कुंड आता ‘भीमकुंड’ म्हणून ओळखला जातो. सात पर्वतांच्या कुशीतील ९०० वर्षांपूर्वीचा गावीलगड किल्ला इतिहासाचा मोठा साक्षीदार आहे.

पोटात भीतीचा गोळा : समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर जाण्यासाठी अरुंद नागमोडी रस्ते, रस्त्याला लागूनच सरळ खोल दरी पाहून पर्यटकांच्या पोटात भीतीचा गोळा उठल्याशिवाय राहत नाही. याचबरोबर मंकी पाॅइंट, भीमकुंड, बकादरीसारखे पॉइंट बघताना उत्सुकतेबरोबरच

भीतीही वाटू लागते.
कीचकदरा दरी : चिखलदऱ्यापासून १२ किमीवर कीचकदरा ही दरी अतिशय खोल आहे. उंच डोंगरावरून या दरीत पाणी कोसळते. पाणी पडताना तर दिसते, पण तळ दिसत नाही.
भीमकुंड : कीचक राक्षसाचा भीमाने वध करून रक्ताने मखलेले हात ज्या कुंडात धुतले तो कुंड आता ‘भीमकुंड’ म्हणून ओखळला जातो. डोंगरावरून वाहून येणारे पाणी या कुंडात कोसळते. खळाळत पडणारे पांढरे शुभ्र पाणी पाहून डोळे तृप्त होतात. भीमकुंडाजवळील दरी साडेतीन हजार फूट खोल आहे. दरीवरील दृश्य विहंगम आहे.

व्ह्यू पॉइंट्स : गोराघाट, पंचबोल आणि हरिकेन पॉइंट अावर्जून भेट द्यावे असे आहेत. पंचबोल पॉइंट येथे सातपुडा रांगेतल्या पाच डोंगरकड्यांचा सुंदर मिलाफ आहे. जोरात आरोळी मारल्यास पाच प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येतात. म्हणून या ठिकाणाला पंचबोल पॉइंट म्हणतात. येथून निसर्गाचे सौंदर्य व सूर्यास्ताचे देखणे दृश्य न्याहाळता येते. शिवसागर स्थळावरून सातपुड्याच्या रांगा, हरिकेन व गोराघाट स्थळ दिसतात. हरिकेन पॉइंटवरून गावीलगड किल्ला, मोझरी गाव, वैराटची टेकडी आणि डोंगराखालच्या सर्व भागाचे निरीक्षण करता येते. प्रॉस्पेक्ट पॉइंटवरून सेमाडोह जंगल बघता येते. या जंगलात अडीचशेपक्षा अधिक पक्षी, असंख्य वन्याजीव व औषधी वनस्पती आहेत. मोझरी पॉइंटहून डोंगररांगेतील वनसंपदा, खोल दरी, पाण्याचे धबधबे, गावीलगडची पश्चिम बाजू आणि देवी पॉइंटचे पठार दिसते. देवी पॉइंट येथे मोठ्या शिलाखंडाच्या खालच्या बाजूला देवी विराजमान आहे. देवी पाइंटपासून वर आल्यानंतर समोरचा शक्कर तलाव आणि तिथे सुरू असलेला नौकाविहार हे रमणीय दृश्य पाहायला मिळते.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रमणीय वने, घाट आहेत. खळखळणारे नदी-नाले, विस्तीर्ण पहाडी, अवघड दरी आणि विविध वन्यजीव आहेत. वन्यप्राणी पाहण्यासाठी वन विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. या प्रकल्पामध्ये चिखलदरा, धारणी तालुक्यातील वनक्षेत्राचा समावेश होतो. मेळघाटात वान, अंबाबरवा, नरनाळा व मेळघाट ही चार अभयारण्ये व गुगामल हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. वाघांबरोबरच बिबटे, अस्वल, चितळ, सांबर, उडती खार आदी प्राण्यांच्या जाती असून २५० पेक्षा अधिक पक्षी आहेत. सागवान व वनौषधींचा समावेश आहे. अमरावतीवरून १०० किमीवर हे पर्यटनस्थळ आहे.

गावीलगड किल्ला
देवी पॉइंटपासून तीन किमींवर ९०० वर्षांपूर्वीचा गावीलगड किल्ला आहे. ३४ एकर जागा आणि सात डोंगरांवर वसलेला हा एकमेव किल्ला असावा. संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत असल्याने हा किल्ला सर करण्यास अवघड आहे.

औरंगाबादहून कसे जाल
औरंगाबाद ते अमरावती ३५६ कि.मी. ५१६ रुपये लक्झरी बसभाडे, ४४७ रुपये रातराणी भाडे, ३७८ रुपये साध्या बसचे भाडे, अमरावती ते चिखलदरा ९४ कि.मी.