आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Died While Searching Hospital, Mother Claim

हॉस्पिटल शोधताना झाला होता 'त्या' चिमुकलीचा मृत्यू, आईचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आईच्या कुशीत आम्रीबाल ही तीन वर्षांची मुलगी मरण पावल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौकात घडली. या चिमुरडीवर उपचारासाठी हॉस्पिटलचा शोध सुरू असतानाच तिने प्राण सोडले, असा जबाब तिच्या आईने पोलिसांना दिला असून आम्ही भिकारी नव्हे तर सिग्नलवर छोट्या वस्तू विकतो, असेही तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, तिच्या मृतदेहावर बुधवारी बेगमपुरा पोलिसांनी बचत गटाच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. तिच्या अंत्यसंस्कारासाठी या कुटुंबाकडे पैसे देखील नव्हते. दरम्यान, मृत बालिकेचा पोस्टमाॅर्टेम रिपोर्ट डॉक्टरांनी उघड केला नाही.

गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या दामिनी पथकाला मंगळवारी सायंकाळी सूर्याशीबाई राजू बागरी (३५) सध्या रा. ए. एस. क्लबजवळ, वाळूज, मूळ रा. सांगोद, जि. कोटा, राज्य राजस्थान) या महिलेच्या कुशीत तीन वर्षांची मृत बालिका आढळून आली होती. या प्रकरणी तिच्या आई सूर्याशीबाई आणि वडील राजू यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील इतर चार मुला-मुलींना बाल सुधारगृहात ठेवण्यात आले.

अनेक गोष्टींचा उलगडा : पोलिस उपनिरीक्षक जयश्री कुलकर्णी यांनी बालिकेच्या आई-वडिलांची चौकशी केली. तेव्हा अनेक बाबी समोर आल्या. सूर्याशीबाई हीच मृत बालिकेची आई असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. तिने सांगितले की, आम्रीबालला लहानपणापासूनच अन्ननलिकेचा त्रास आहे. ती थोडी कुपोषितही असून द्रव पदार्थांशिवाय काहीच खाता येत नव्हते. दोन दिवसांपासून तिला उलट्या आणि जुलाब होत होता. त्यातच उन्हाचा पारा वाढला. शहर नवीन असल्यामुळे कुठे उपचार घ्यावेत हे कळत नव्हते. मुलीचे काका आणि वडील हॉस्पिटल शोधत होते. त्याचवेळी मी सिग्नलवर पोलिसांना सापडले. त्यांनी आम्हाला डॉक्टरकडे नेले आणि माझी मुलगी मरण पावल्याचे मला सांगण्यात आले, असेही सूर्याशीबाईने सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयश्री कुलकर्णी आराधना आठवले करीत आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी जे. पी. घुले या देखील तपासात मार्गदर्शन करत आहेत.

प्रयोगशाळेत दिले रक्ताचे नमुने
मृत मुलगी ही सूर्याशीबाईचीच आहे का हे तपासण्यासाठी दोघांच्या रक्ताचे नमुने शहरातील तीन प्रयोगशाळांत तसेच मुंबईला पाठवण्यात आले आहे. सूर्याशीबाई हिच्या राजस्थानातील कोटाजवळ असलेल्या सांगोत या गावात पोलिसांनी संपर्क साधला असता नातलगांनी मृत मुलगी तिचीच असल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.