आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवाशी खेळ: उघड्या डीपीचा शॉक लागून चार वर्षांचा मुलगा गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळेतून घरी जात असताना रस्त्यातील विजेच्या उघड्या डीपीचा विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे शॉक लागून चार वर्षांचा साई सुनील कडवे हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर धूत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी मूर्तिजापूर येथे घडली. तो व्यंकटेश पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे. अशाच प्रकारे शहरातील उद्याने, बाजारपेठा, मुख्य रस्ते, खेळाची मैदाने, शाळा आदी ठिकाणी डीपी उघड्या आहेत. जीटीएलच्या 3 हजार डीपींपैकी 850 डीपी उघड्या आणि धोकादायक आहेत.

गजानननगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, गारखेडा, टीव्ही सेंटर, सिडको-हडको, शहागंज, औरंगपुरा, उस्मानपुरा, क्रांतीनगर, रेल्वेस्टेशन आदी भागांतील डीपींना संरक्षक भिंती नाहीत. अनेक डीपींतून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. काहीमधून स्पार्किंग होताना दिसून येते. शाळा आणि खेळांच्या मैदानाजवळ असलेल्या डीपींमुळे शाळकरी मुलांसाठी धोकादयक ठरत आहे. डीपींना झाकण लावल्यास अनुचित प्रकार टळेल.

जीटीएलकडून जखमी मुलाला पाच हजारांची मदत
डीपीचा शॉक लागून जखमी झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली असल्याची माहिती जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी सांगितली. शहरातील उघड्या डीपींवरील झाकणे चोरीस गेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदारांच्या आदेशाला ठेंगा
जिल्हा विद्युतीकरण समितीच्या रविवार, आठ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत दोन दिवसांत उघड्या डीपींना झाकणे लावा आणि लोंबकळणार्‍या विद्युत तारा व्यवस्थित कराव्यात, अशा सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्या होत्या. पण त्यांच्या आदेशाकडे जीटीएलने वेळीच दखल घेतली असती तर मूर्तिजापूरमधील घटना घडली नसती, असा संताप या भागातील नागरिकांनी व्यक्त केला. शहरात ठिकठिकाणी तारा लोंबकळत आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत या तारा धोकादायक ठरणार असून जीटीएलने याची वेळीच दक्षता घ्यावी, अशी मागणी समोर येत आहे.

जीटीएलविरोधात कारवाई करू
शनिवारी झालेल्या बैठकीत उघड्या डीपींना दोन दिवसांत झाकणे लावण्याच्या सूचना केल्या होत्या, पण जीटीएलने त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. मूर्तिजापूरमध्ये घडलेली घटना गंभीर असल्यामुळे जीटीएलच्या विरोधात कारवाई केली जाईल.
-खा. चंद्रकांत खैरे, अध्यक्ष, विद्युतीकरण समिती

गवतही वाढले
हडको एन-12 स्वामी विवेकानंदनगर भागांतील दोन उघड्या डीपी आहेत. त्यांना संरक्षण भिंती बांधलेल्या नाहीत. डीपीजवळ गवत वाढले आहे. याची जीटीएलने खबरदारी घ्यावी.
-विक्रम पवार, नागरिक, सिडको

थरकाप उडवणारी घटना
साई व्यंकटेश पब्लिक स्कूलमध्ये शिकतो. तो शाळेतून घरी येत असताना त्याला डीपीचा शॉक लागला. थरकाप उडवणारी ही घटना आहे. उघड्या डीपीतील विद्युत प्रवाहाने त्याला खेचून घेतल्यामुळे जखमी झाला.
-रंजना बारसे, साईची आत्या