आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत शहरात विषाणूजन्य आजार; न्यूमोनियाचे रुग्ण वाढले,बालरुग्णालये ‘फुल्ल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सध्या सर्दी-खोकला-तापासह न्यूमोनिया, डायरियाचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यूसदृश रुग्णांची संख्याही वाढली असून घाटीमध्ये डेंग्यूसह मलेरियाचेही रुग्ण आढळत आहेत.

त्यामुळे सर्वत्र विषाणूजन्य (व्हायरल) आजारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. घाटीतील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत जूनपासून आतापर्यंत डेंग्यूसदृश व्यक्तींचे सुमारे 40 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 9 नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे डेंग्यूचे रुग्ण बजाजनगर तसेच सिडको एन दोन, अयोध्यानगर, कस्तुरीनगर, एसटी कॉलनी आदी परिसरातील आहेत. गेल्या दोन दिवसांत पाच मलेरियाचे रुग्णही सापडले आहेत, तर सध्या गॅस्ट्रोचे दोन महिला रुग्ण घाटीमध्ये दाखल आहेत. यातील एक महिला मोंढा नाका व दुसरी पिसादेवी येथील आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांनी बुधवारी दिली. यंदा जूनपासूनच डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत, हे विशेष.

प्रौढांमध्ये गॅस्ट्रोचे प्रमाण जास्त
शहरातील प्रौढांमध्ये सर्वाधिक प्रमाणात ‘व्हायरल डायरिया’चे आहे. तापेसह न्यूमोनियाचेही रुग्ण ओपीडीमध्ये आढळत आहेत. डेंग्यूसदृश रुग्ण दिसत असले तरी ते कमी आहेत आणि मलेरियाचे रुग्ण सध्यातरी शहराबाहेरचे आहेत, असे फिजिशियन-इंटेन्सिव्हिस्ट डॉ. समीध पटेल यांनी सांगितले, तर सध्याचे बहुतांश आजार हे विषाणूजन्य आहेत, असे फिजिशियन-इन्टेसिव्हिस्ट डॉ. आनंद कुलकर्णी म्हणाले.

घाटीचे डीन डॉ. भोपळे पडले आजारी !
घाटीचे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे हेसुद्धा आजारी पडल्याचे सूत्रांकडून समजले. डॉ. भोपळे हे बुधवारी (दहा जुलै) अधिष्ठाता कार्यालयात नव्हते. दुपारी कार्यालयामध्ये येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, दुपारनंतरही ते आले नाहीत. तब्येतीच्या कारणावरून ते आले नसल्याचे सांगण्यात आले.

विषाणूजन्य आजारांपासून अशी घ्या काळजी
0गॅस्ट्रोपासून असे करा संरक्षण
0पिण्याचे पाणी उकळून प्यावे
0प्युरिफायर वापरणे हिताचे
0थंड खाद्यपदार्थ टाळावेत

फ्लूपासून असे करा संरक्षण
0सर्दी-खोकला असणार्‍या व्यक्तींजवळ जाऊ नका
0वेळोवेळी हात स्वच्छ धुवा
0डिसइन्फेक्टंटचा वापर करा

डेंग्यू-मलेरियापासून असे करा संरक्षण
0पाण्याची साठवण कमीत कमी करा
0साठवलेले पाणी जरूर झाकून ठेवा
0सर्व डासांपासून संरक्षण करा

बालरुग्णालये ‘फुल्ल’
शहरातील बालरुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागामध्ये 70 ते 80 टक्के रुग्ण हे व्हायरल फीव्हर तसेच व्हायरल डायरियाचे आहेत. त्याचबरोबर सर्दी-खोकला-तापाचे रुग्णही वाढले आहेत. काही प्रमाणात बालकांमध्ये न्यूमोनिया दिसून येत आहेत. डेंग्यू व डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या र्मयादित आहे. अर्थात, डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण कमी आणि डेंग्यूसदृश रुग्ण जास्त असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शेवाळे व बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन खंबायते यांनी नोंदवले.