आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चितेगावमधील अँलाना कंपनीतील 75 बालकामगारांची मुक्तता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चितेगाव औद्योगिक वसाहतीतील अँलाना या कंपनीत परराज्यांतून कामासाठी आणलेल्या 75 बालकामगारांची कारखान्यावर छापा मारून बुधवारी मुक्तता करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अँलाना कंपनीच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये मँगो ज्यूसची पॅकिंग केली जाते. या कामासाठी झारखंड, बिहार व इतर राज्यांतून मुले आणली जात असल्याची माहिती चाइल्डलाइनचे अनिल सपकाळ व संतोष मंजूळ यांना मिळाली होती. चार दिवस कारखान्यावर पाळत ठेवून खात्री पटल्यानंतर बुधवारी चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी कंपनीत छापा मारण्यासाठी बालकल्याण समितीकडून परवानगी घेतली. बुधवारी दुपारी चाइल्डलाइनचे पदाधिकारी, कामगार उपायुक्त व पोलिसांनी छापा मारून 75 बालकामगारांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान कामगारांनी सांगितले की, दोन महिन्यांच्या करारावर आम्हाला या कारखान्यात आणले जात असून यापूर्वीही आम्ही येथे आलेलो आहोत. पोलिसांनी सर्वांना बालकल्याण समितीसमोर उभे केले असता त्यांना विविध बालगृहांत ठेवण्याचे आदेश दिले.

ठेकेदार व कंपनी मालकावरही कारवाई शक्य : परराज्यांतून बालकामगार आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतले जाते. आमचे पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेत त्यांची मुक्तता केली. प्रत्यक्षात ठेकेदार व कंपनी मालकावरही कारवाई केल्यास यापुढे कोणी बालकामगारांची पिळवणूक करू शकणार नाही, असे चाइल्डलाइनच्या प्रा. हेमलता कुलकर्णी यांनी सांगितले.

शहरात पहिल्यांदा मोठी कारवाई
बालकामगारासंदर्भात झालेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. शहरात अशा प्रकारे बालमजुरांकडून काम करवून घेतले जात असेल तर पोलिस किंवा बालकल्याण समितीस माहिती दिल्यास कारवाई होईल.
-चंद्रभान जंगले, प्रभारी अधीक्षक, बाल निरीक्षण गृह.

न्यायालयाच्या परवानगीनेच छापा
बालकल्याण समितीने दिलेल्या परवानगीनंतर कंपनीत छापा मारला असून परराज्यांतील बालमजुरांची मुक्तता करण्यात यश आले. अन्य कंपन्यांतील कामगारांबाबत नागरिकांनी माहिती दिल्यास आम्ही कारवाई करू.
-निर्मला परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक, चिकलठाणा पोलिस ठाणे