आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हस्तांतरणाने चिल्ड्रन पार्कचा मार्ग मोकळा; प्रश्न सुटला आता पूर्णत्वाची प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वाहतुकीच्या समस्यांना नाशिककरांना रोजच तोंड द्यावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कची संकल्पना पुढे आली आणि नाशिक फस्ट या संस्थेने या उपक्रमास दत्तकही घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार तिडके कॉलनीतील अडीच एकर जागा महापालिकेने नाशिक फस्र्टकडे हस्तांतरित केली आहे. या दोन्ही संस्थांमध्ये करारही झाला आहे.

बालपणाचे संस्कार योग्य पद्धतीने न झाल्यास भविष्यात मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाहतुकीच्या नियमांबाबत याची अनुभूती रोजच येते. नियमांची माहितीच नसल्यामुळे सर्वत्र वाहतुकीचा खोळंबा झालेला दिसतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाविषयी शालेय जीवनापासूनच माहिती मिळाल्यास येणारी भावी पिढी वाहतूक व्यवस्थेबाबत सजग बनेल या उद्देशाने नाशिक फस्र्ट या संस्थेने ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कची संकल्पना पुढे आणली. दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यास मंजुरी मिळाली आणि आता जागा हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. तसेच या संस्थेचा पालिकेबरोबरचा करारही झाला आहे.

असा असेल परिसर
बांधकाम विरहित परिसर : 63.81 स्केअर मीटर
अंशत: बांधकाम विरहित परिसर : 597.51 स्के. मी.
वाहनतळ : 995.36 स्के. मी.
रस्त्यालगतची जागा : 235.62 स्के. मी.
बांधकाम (प्रशासकीय इमारत, : 200 स्के. मी. गॅलरी, स्वच्छतागृह)
संरक्षक भिंतीची लांबी : 760 रनिंग मीटर

ट्रॅफिक पार्क
पार्कमधील रस्ते : 1118.58 स्के. मी.
पदपथ: 141. 29 स्के. मी.
एकूण बांधकामविरहित परिसर: 1425. 74 स्के. मी.
कुंपण : 302 रनिंग मीटर
रचना (बस स्टॉप, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन): 40 स्के. मी.
लायटिंग, सिग्नल लाइटस, पोल लाइटस, बुश लाइटस: 50 नग
अन्य : रस्त्यांना आवश्यक सुविधा, कचराकुंडी : 40. 5 स्के.मी.

जागृतीसाठी महत्त्वाचे
वाहतुकीविषयी बाल्यावस्थेतच जागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत आहे. त्यासाठी साधारणत: तीन एकर जागेचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिकेने जागा हस्तांतरित केली आहे.
-सुनील खुने, शहर अभियंता

प्रायोजकांचा शोध सुरू
पालिकेबरोबर 15 वर्षांचा करार झाला आहे. शालेय पातळीपासूनच वाहतुकीच्या शिस्तीचे धडे मिळाल्यास भविष्यात समस्या कमी होतील. ही बाब लक्षात घेऊन नाशिक फस्र्ट संस्थेने ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पासाठी साधारणत: तीन कोटींपर्यंत खर्च येणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रायोजकांचा शोध सुरू आहे. वर्षभरात प्रकल्प पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
-अभय कुलकर्णी, अध्यक्ष नाशिक फस्र्ट

काय असेल या पार्कमध्ये?
या पार्कमध्ये बस थांबा, रेल्वे स्टेशन, रस्ते आणि रस्त्यांवरील सूचना फलक, वाहतुकीचे नियम दर्शविणारे फलक, पेट्रोल पंप, शाळा, मॉल्स, उड्डाणपूल, अंडरपास आदींच्या प्रतिकृती असतील. तसेच मुलांना छोटेखानी वाहने दिली जातील. ही वाहने चालविताना वाहतुकीच्या नियमांचे कसे पालन करायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल. पार्कमध्येच उपाहारगृहाचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे.