आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्ती-निसर्गचित्रे हुबेहूब रेखाटणारा बालचित्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादे ठिकाण बघताच ते त्याच्या मनात पक्कं बसतं. घरी येताच तो ते जसेच्या तसे कागदावर साकारतो. त्यात रंग भरताच ते चित्र जिवंत होते. नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका बाल कलाकाराची ही चित्रकला. कोणताही वारसा नसताना त्याने ही कला आत्मसात केली आहे. चित्रकलेतील शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन मला मोठा चित्रकार व्हायचे आहे, असा निश्चयही त्याने केला आहे. परिस्थिती बेताचीच. त्यामुळे वडील खाऊसाठी म्हणून रोज जे ५ रुपये देतात, ते तो साठवतो आणि चित्रकलेचे साहित्य विकत घेतो. याकामी आई-बाबा आणि शिक्षक त्याला प्रोत्साहन देतात.
बीड बायपास रोडवरच्या अय्यप्पा मंदिराजवळील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या या बाल कलाकाराचे नाव आहे गौरव कैलास चौधरी. शाळेत चित्रकलेचा तास सुरू असताना गौरवची बोटे वेगळ्याच रेषा काढण्यात व्यग्र असतात. यातून मग कधी एखादे निसर्गरम्य ठिकाण तयार होते, तर कधी महापुरुषांचे स्केच साकारले जाते. तास संपेपर्यंत त्याची कलाकृती तयार असते. ही चित्रे बघून सर्वांच्या तोंडून केवळ कौतुकच बाहेर पडते. गौरवच्या घरात कलेची कोणतीच पार्श्वभूमी नाही. असे असतानाही निसर्गदत्त अशी ही देणगी त्याला मिळाली आहे.

बालपणापासूनच छंद : गौरवचे कुटुंब मूळ पैठण तालुक्यातील बिडकीनचे. गावाकडे शेती नाही. काही कामही नाही. यामुळे पाच वर्षांपूर्वी कामाच्या शोधात ते औरंगाबादेत आले. काम काही मिळाले नाही. म्हणून हातगाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. खोकडपुऱ्यात भाड्याचे घर घेतले. भाजी विक्रीतून घरगाडा चालवणे कठीण जात असल्याने आईने घरातच मेस सुरू केली. एक बहीण अर्पिता शारदा मंदिरमध्ये सहावीत आहे. गौरव लहानपणापासूनच चांगली चित्रे काढायचा. पण या कलेकडे घरच्यांचे विशेष लक्ष गेले नाही. तीन वर्षांपूर्वी सहावीत असताना तापडिया आर्ट गॅलरीत त्याने प्राण्यांच्या चित्रांचे एक प्रदर्शन बघितले आणि त्यालाही अशीच चित्रे काढण्याची प्रेरणा मिळाली.
कामाची गती
आर्थिक स्थिती खूप चांगली नाही. त्यामुळे गौरवची ही कला वृद्धिंगत व्हावी म्हणून वडिलांनी प्रत्येक वाढदिवसाला चित्रकलेसाठीचे एक-एक साहित्य विकत घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पहिल्यांदा ट्यूब, पोस्टर कलर घेतले. मग थोडे ब्रश व रंगही घेतले. या साहित्याचा वापर करून गौरव एकाहून एक सुंदर चित्रे साकारत आहे. बघितलेली ठिकाणे, महापुरुषांची व्यक्तिचित्रे तो हुबेहूब काढतो. शाळेत कला शिक्षकांच्या चित्रासोबतच त्याचे चित्र पूर्ण होते. त्याचा हा वेग सर्वांनाच चकित करून जातो.
रोज ५ रुपयांची बचत : कैलास चौघरी आपल्या या गुणी मुलाच्या कलेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देतात. वडिल भाजी विकून आपल्या छंदासाठी पैसे देतात, याची त्याला जाणीव आहे. तो दिवाळीला फटाके विकत घेत नाही. बाहेर खाण्यापिण्याचा खर्चही तो होऊ देत नाही. रोज नित्यनियमाने चित्रे मात्र तो काढतो. कला जाेपासताना त्याने शाळेत कधीच ८५ टक्क्यांच्या खाली मार्क घेतलेले नाहीत, हे विशेष.
चित्रकला मला मनापासून आवडते. भविष्यात चांगला चित्रकार होऊन देशाचे नाव मोठे करायचे आहे. काही अडचणी आहेत; पण माझे आई-बाबा त्यांचा विचार न करता त्या दूर करत आहेत.
-गौरव कैलास चौधरी, बालचित्रकार

आमची परिस्थिती नसतानाही गौरवच्या चित्रकलेला वाव देण्यासाठी आम्ही शक्यतो ते सर्व सहकार्य करत आहोत. परिस्थिती बेताची आहे. तरी आम्ही त्याला काही कमी पडू देणार नाही.
-कैलास चौधरी, गौरवचे वडील

गौरव हा अत्यंत गुणी व इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. अभ्यासातही त्याची प्रगती चांगली आहे. अनेकदा तो खोकडपुऱ्याहून शाळेत पायी येतो. त्याला मदत झाल्यास भविष्यातील कलाकार घडू शकेल.
-अभय कुलकर्णी, चित्रकला शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, बीड बायपास
पुढील स्‍लाइडवर पाहा, त्‍याच्‍या पेंटिग्‍ज ..