आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Children Day Celebration Issue At Divya Marathi Office

जादूगार अमरने फिरवली जादूची कांडी, तर चार्ली चॅप्लिनने हसवून दुखवले पोट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हातात फुगे, छान छान रंगीबेरंगी ड्रेस, कुणी चाचा नेहरू, तर कुणी पोलिस, परी बनून बच्चेकंपनी "दिव्य मराठी'च्या प्रिंटिंग युनिटमध्ये आली अन्् सर्वांनी धम्माल मजा आणि मस्ती केली. जादूगार अमरने जादूची कांडी फिरवली आणि चार्ली चॅप्लीन छपाई मशीनजवळ प्रकटला. त्याला पाहून बाळगोपाळांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात चार्लीचे स्वागत केले. मग दोन तास चार्ली अन्् जादूगार अमरने चिमुकल्यांचे धम्माल मनोरंजन केले. बालदिनानिमत्त "दिव्य मराठी'चे कर्मचारी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांसाठी ही विशेष पर्वणी होती.

कार्यालयात आल्यानंतर प्रत्येकाच्या हातात फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी बच्चेकंपनीसाठी एक सरप्राइज गिफ्ट आणले होते. नाष्टा घेतल्यावर मुलांनी पेटाऱ्यातून गिफ्ट उघडले आणि एकच धांदल उडाली. पेटाऱ्यातून अजगर निघताच कोणी घाबरले, तर कुणी आश्चर्यचकित झाले. थोडा वेळ गेल्यानंतर मुलांची भीती पळाली अन्् मुलांनी त्याला स्पर्श केला. निवासी संपादक दीपक पटवे आणि डॉ. पाठक यांनी मुलांना पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून दिले.

बाबांची प्रेस पाहून मुले झाली इम्प्रेस : लहानपणापासून बाबा कुठे तरी बाहेर जातात. आई नेहमीच म्हणते, ऑफिसात जातात. बाहेर जातात, काम करतात. या सर्वच गोष्टी कुतूहल निर्माण करत असत. नेमकं काय बरं काम बाबा करतात, याची उत्सुकता शमवण्याचा हा छोटास प्रयत्न म्हणून ऑफिसच्या कार्यालयात भेट देताच मुले म्हणाली, बाबा तुमची प्रेस पाहून आम्ही भारावून गेलो. कामाच्या वेगळ्या वेळा, पेपरची ती दुनिया काही न्यारीच. रोज हातात पेपर न्याहाळताना तो कसा तयार होत असेल हे प्रत्यक्ष पाहताना सहज न दिसणारी ही प्रेस पाहूनही मुले अवाक् झाली होती.

प्रिंटिंग युनिटमध्ये जादूगार अमर अन् चार्ली
बच्चेकंपनी बसमध्ये “दिव्य मराठी’च्या शेंद्रा येथील प्रिंटिंग युनिटकडे निघाली. तेथे धम्माल मस्ती करत बच्चेकंपनीने प्रवेश केला तोच त्यांना जादूगाराचा आवाज आला. ‘मुलांनो, तुमचे स्वागत आहे. या जादूई नगरीत मी आता तुम्हाला अमेरिकन चार्ली आणून दाखवणार आहे’, असे म्हणताच जादूगार अमर काळा कोट घालून मुलांसमोर प्रकट झाला. त्याने वात नसलेला दिवा हवेत प्रकट केला. मुलांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. तेवढ्यात जादूगाराने एका फटाका फोडला, त्यातून चार्ली प्रकट झाला. विस्मयचकित झालेल्या चार्लीने डोळे मिचकावले. अमेरिकेतून आल्याने तो थोडा भांबावला होता. त्याला पाहून बच्चेकंपनी खुश झाली. मग चार्लीने सर्वांशी शेकहँड केला. मुलांमध्ये जाऊन त्याने फोटोही काढला.

पहाडी अजगर जवळून पाहिला
शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये हॅडोर पहाडी अजगर आढळून आला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला ड्रममध्ये बंद करून अग्निशमन दलाकडे सुपूर्द केले. सर्पमित्र सुभाष राठोड, डॉ. किशोर पाठक यांनी त्यास ताब्यात घेतले. हा रॉक पायथन म्हणजेच पहाडी अजगर आहे. तो डोंगराळ प्रदेशात आढळतो. हा अजगर आठ फूट लांब असून तो २० फुटांपर्यंत वाढू शकतो. डॉ. पाठक यांनी हा अजगर "दिव्य मराठी' कार्यालयात आणला. बच्चेकंपनीने हा अजगर जवळून पाहण्याबरोबरच त्याला स्पर्श करून धिटाई दाखवली