आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांनी रंगवले चित्र, पार्किंगच्या ठेकेदाराने भरला गल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. मात्र ही स्पर्धा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी होती की सिद्धार्थ उद्यान वाहनतळाच्या ठेकेदाराच्या भल्यासाठी, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. 

स्पर्धेसाठी साडेचार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने पालक स्वत:च्या वाहनांतून तेथे आले आणि पार्किंगसाठी त्यांना प्रत्येकी २० रुपये मोजावे लागले. तीनच तासांत ठेकेदारच्या गल्ल्यात ८० हजार रुपये जमा झाले. उद्यान तसेच प्राणिसंग्रहालयातील प्रवेश विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवण्यात आला होता. या स्पर्धेसाठी पाल्यांना घेऊन येणाऱ्या पालकांकडून वाहनतळाचे शुल्क आकारणे चुकीचे होते. परंतु मनपा अधिकाऱ्यांनी तसे कोणतेही पत्र ठेकेदाराला दिले नाही. संत एकनाथ रंगमंदिर तसेच सिडको नाट्यगृह येथील वाहनतळाचा ठेका देण्यात आला असला तरी तेथे पालिकेचे कार्यक्रम असेल तर वाहनधारकांसाठी शुल्क माफ केले जाते. हा नियम येथे पाळला गेला नाही. सकाळी ते ११ अशी स्पर्धेची वेळ होती. त्यासाठी पालक सकाळी पासूनच हजर झाले होते. एका वाहनासाठी ठेकेदारान २० रुपये शुल्क आकारले. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साडेचार हजार विद्यार्थ्यांना घेऊन पालकांची सुमारे चार हजार वाहने तेथे आली होती. त्यांच्याकडून तीनच तासांत ठेकेदाराने ८० हजारांची कमाई केली. विशेष म्हणजे ठेकेदाराचा गल्ला रविवारी सुमारे हजार तर इतर दिवशी अडीच ते तीन हजार रुपये असतो. त्यामुळे ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी की ठेकेदाराच्या भल्यासाठी, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. 

अधिकाऱ्यांची बनवाबनवी : वाहनतळाचाविषय मालमत्ता विभागाकडे येतो. याचे प्रमुख वामन कांबळेंकडे विचारणा केली असता त्यांनी बीओटी विभागाकडे बोट दाखवले. बीओटी विभागाचे प्रमुख, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनीही हात झटकले. शिक्षण विभागाचे उपायुक्त रवींद्र निकम यांनीही वाहनतळाशी संबंध नसल्याचे सांगितले. 

प्राणिसंग्रहालयात नि:शुल्क प्रवेश 
स्पर्धेसाठीमुले तसेच त्यांचे पालक येणार असल्याने सकाळच्या सत्रात मुलांबरोबर पालकांसाठीही उद्यानातील प्रवेश नि:शुल्क ठेवण्यात आला होता. स्पर्धा संपल्यानंतर प्राणिसंग्रहालय पाहता यावे म्हणून तेथेही शुल्क आकारण्यात आले नाही. प्राणिसंग्रहालयात मुलांसाठी २०, तर मोठ्यांसाठी ५० रुपये शुल्क आहे. 

पालकांशी उर्मट भाषा 
दरम्यान,वाहन शुल्क आकारण्याला काही पालकांनी आक्षेप घेतला. आम्ही येथे मुलांना स्पर्धेसाठी घेऊन आलो, असे त्यांनी सांगितले. मात्र ठेकेदाराने उर्मट भाषा वापरून अवमान केल्याची तक्रार पालकांनी केली. यावरून वादही झाला, परंतु ठेकेदाराने शुल्कवसुली सोडली नाही. उद्यानात येणाऱ्या नागरिकांशी या ठेकेदाराचे वर्तन असेच असल्याचे काहींनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...