आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतिमंदांसाठी ‘नवजीवन’चा स्तुत्य उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गतिमंद, आत्ममग्न मुले एकटे राहू शकणार नाहीत. आपल्या वृद्धापकाळात किंवा आपल्या पश्चात गतिमंद पाल्याचा सांभाळ कोण आणि कसा करणार, अशी चिंता त्यांच्या पालकांना असते.
गतिमंद पाल्यांचे पुनर्वसन हेच नवजीवन पालक संघाचे ध्येय असून त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. गतिमंदत्व हे अपंगत्व अन्य प्रकारच्या अपंगत्वापेक्षा अगदी वेगळे आहे. अन्य प्रकारात शिक्षण- प्रशिक्षण याद्वारे अपंगांना स्वावलंबनाचे धडे देऊ शकतो. क ारण त्यांना शारीरिक व्यंग असते. भाषा व भावना व्यक्त करता येतात. पण गतिमंद पाल्यांमध्ये नेमकी समज नसते. आपल्या भावना गरजा त्यांना व्यक्त करता येत नाहीत. म्हणून ते परावलंबी असतात. त्यामुळे त्याचा ताण पालकांवर निश्चित पडतो. त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. त्या तीव्र गतिमंदाच्या भोवतीच ते फिरत राहतात. कारण अशा मुलांचे पालनपोषण चांगल्या रीतीने तर करावेच लागते, पण त्यांना जगवण्याची, समाजात मिसळवण्याची जबाबदारी पालकांवर येऊन पडते. गतिमंद मुलांना पालकांपासून दूर राहण्याची आणि पालकांना पाल्याशिवाय राहण्याची सवय झाली तर त्यामधून काही चांगले निर्माण होऊन कौटुंबिक सौख्य निर्माण होईल, अशी अपेक्षा काही पालकांनी मनात धरून निवासी केअर सेंटरची स्थापना करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने शहरात चालवल्या जाणा-या वसतिगृहांना भेटी देऊन तेथील नित्यक्रमांचा अभ्यास करण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर 2012-2013 या वर्षापासून ‘डे केअर सेंटर’ पालकांनी चालवले व त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे, हे लक्षात आल्यावर नवजीवन सोसायटी पुनर्वसन केंद्राच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला. नवजीवन सोसायटी (मतिमंदांसाठी पुनर्वसन केंद्र) आणि नवजीवन पालक संघ संचलित गतिमंदांसाठी नवजीवन निवासी केअर सेंटर व डे केअरची सुरुवात 1 जून 2014 पासून करण्याचे ठरविले. यामध्ये नवजीवन सोसायटीकडून सर्व मदत मिळाली असून नवजीवन पालक संघाचे सदस्य हे दोन्ही सेंटर प्रशिक्षित तज्ज्ञ स्पेशल टीचरच्या माध्यमातून चालविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. गतिमंद पाल्याचे स्वभाव, सवयी, आवडीनिवडी, आहाराची दक्षता औषधांचा नियमितपणा याची जाणीव व काळजी असणारे पालक यात स्वयंस्फूर्तीने सहभागी आहेत. त्याचप्रमाणे पालक संघाचे सदस्य स्वत:ची मुले, मुली या ठिकाणी डे केअर सेंटरमध्ये प्रवेश घेणार असल्यामुळे गतिमंद पाल्यांचा विकास हेच ध्येय समोर राहणार आहे.
डे केअर सेंटर आणि निवासी केअर सेंटरचा उपक्रम शासनाच्या अनुदानाशिवाय राबविला जाणार आहे. पालकांची वर्गणी व समाजाने दिलेल्या देणग्यांवरच याची निर्भरता राहणार आहे. साधारणपणे 25-30 गतिमंद मुलांची निवासी सुसज्ज व्यवस्था असून 10-15 मुलांसाठी डे केअर सेंटर असेल. यात कार्यकारिणी सदस्य बंधू-भगिनींचा प्रत्यक्ष सहभाग राहणार आहे. त्यांच्या अंगच्या कलागुणांचा विकास करण्याचे पालक संघाचे ध्येय आहे. त्यामुळे गतिमंद मुलांच्या पालकांनी आपल्या मुलाचे त्या ठिकाणी प्रवेश निश्चित करावे आणि या संधीचा फायदा घेऊन आपल्या जीवनात आनंदी क्षणांची जोपासना करावी. संस्थेच्या कार्यात सहभागी होऊन संस्थेशी मैत्रीचे नाते जुळवावे. आपले मन जागृत ठेवून सहकार्याचा हात पुढे करावा. जीवनातील आनंदाचे क्षण या मुलांसोबत साजरे करू शकता. या बालकांना आपल्यात मिसळून घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. देणगी देऊन त्यांच्या आयुष्याची बाग फुलवून त्यांच्या पालकांना आनंद देऊ शकता.
आर. पी. दुसे,औरंगाबाद