आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Tourists Number Will Be Increase Chinese Vice President

चिनी पर्यटकांचा अजिंठा लेणीकडे ओघ वाढवू - चीनच्या उपराष्‍ट्रपतींचे आश्‍वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ली युआन चाओ यांच्याशी दुभाषकांच्या माध्यमातून चर्चा करताना महापौर त्र्यंबक तुपे.
औरंगाबाद - अजिंठा लेणी आणि डनहुआंगच्या मुगाओ लेणी यांच्यातील साम्य हा दोन शहरांमधील सांस्कृतिक बंध असून या लेणींच्या संवर्धनासाठी दोन शहरांनी मिळून एका तंत्रज्ञानाचे आदान प्रदान केले पाहिजे अशी अपेक्षा चीनचे उपराष्ट्राध्यक्ष ली युआन चाओ यांनी व्यक्त केली. भारत आणि चीन यांच्यात पर्यटन व्यापारातून संबंध वृद्धिंगत करता येतील येणाऱ्या काळात चीनमधून जास्तीत जास्त पर्यटक येथे यावेत यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आलेले चीनचे उपराष्ट्राध्यक्ष ली युआन चाओ आणि त्यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज जगप्रसिद्ध लेणींना भेट दिली. अजिंठ्याची मोहक लेणी पाहून मंत्रमुग्ध झालेल्या ली यांच्यासोबत संध्याकाळी एका पंचतारांकित हाॅटेलात महापौर त्र्यंबक तुपे यांची भेट झाली. २० मिनिटांच्या या भेटीत महापौर उपराष्ट्राध्यक्ष यांच्यात सांस्कृतिक पर्यटनविषयक विषयांवर चर्चा झाली. ली यांनी चीनची भूमिका स्पष्ट केली तर महापौरांनी पर्यटन वृद्धी भगिनी शहर करारातून काय करता येईल यावर आपली मते मांडली.
दुभाषांच्या मार्फत झालेल्या या चर्चेआधी महापौर तुपे यांनी महापालिकेच्या वतीने उपराष्ट्राध्यक्ष त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाचे यथोचित स्वागत केले. या वेळी बोलताना ली युआन चाओ म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत. या संबंधांचा इतिहास पाहता ते वृद्धिंगत व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज भारत चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या बाजारपेठा आहेत. त्यात वाढ करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. पर्यटन व्यापाराच्या माध्यमातून त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. आज मी अजिंठ्याची लेणी पाहून खुश झालो. औरंगाबाद आणि चीनमधील डनहुआंग या दोन शहरांत नुकताच भगिनी शहरांचा करार झाला आहे. या दोन शहरांत तेथे असलेल्या प्राचीन बौद्ध लेणी हा समान सांस्कृतिक वारसा आहे. या लेणीच्या संवर्धनासाठी दोन शहरांनी तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर करण्याची गरज आहे. अजिंठ्याचा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी येथे जास्तीत जास्त चिनी पर्यटक यावेत यासाठी प्रयत्न केले जातील असेही ली म्हणाले.

या वेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, पोलिस आयुक्तांची उपस्थिती होती.

दुपारी मनपात पूर्वतयारी : चीनमध्येमहापौर हा त्या प्रांताचा प्रमुख असतो. त्या अनुषंगाने औरंगाबाद दौऱ्यात महापौर भेटीला चिनी दूतावासातून महत्त्व देण्यात आले होते. तसा कार्यक्रमही आधीच निर्धारित करण्यात आला होता. आजच्या चर्चेतही त्यांनी तब्बल २० मिनिटे वेळ देत थेट महापौरांशी चर्चा केली. या चर्चेआधी दुपारी मनपात कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली यांच्यासोबत महापौर त्र्यंबक तुपे यांनी चर्चा करून कोणत्या मुद्द्यावंर चर्चा करायची यावर विचार केला.

हेलिकाॅप्टर सेवा सुरू करण्याचा विचार
महापौर तुपे यांनी औरंगाबाद-अजिंठा-वेरूळ एकत्रित विकसित करण्याचा आराखडा तयार करण्यात येत असून त्यात पर्यटकांच्या सोयीसाठी हेलिकाॅप्टर सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे म्हटले. तसेच डन हुआंग औरंगाबाद या दोन शहरांत शैक्षणिक, सांस्कृतिक भाषांचे आदानप्रदान होण्यासाठी इंडो-चायना एज्युकेशनल हब सुरू करण्याची गरज प्रतिपादित केली. अजिंठा लेणींचे ज्या प्रकारे संवर्धन केले जात आहे त्याच पद्धतीने डनहुआंगच्या मुगाओ लेणींच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचे आदानप्रदान झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चीनच्या पर्यटकांची संख्या नगण्य
२०१२पासून भारत आणि चीन यांच्यात संबंध सुधारल्यानंतर हळूहळू चिनी पर्यटकांचा ओघ भारताकडे सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. औरंगाबादेत येणाऱ्या चिनी पर्यटकांची संख्या नगण्यच आहे.