आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या आमदारांना 'वैदर्भीय' बाळकडू ! पैठणमध्ये होणार समाधान शिबिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शासन अनेक योजना तयार करते. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या योजनांचे लाभ सामान्यांपर्यंत कसे पोहोचवावेत याचे प्रशिक्षण बुधवारी (१५ जून) हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी मराठवाड्यातील भाजप आमदारांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.


राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प विदर्भात जात आहेतच, शिवाय योजनाही चांगल्या पद्धतीने राबवल्या जात असल्याने तेथील लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीचा लाभ मराठवाड्याला व्हावा यासाठी दानवे यांनी पुढाकार घेतला आहे. याच धर्तीवर २२ ऑगस्ट रोजी पैठणमध्ये समाधान शिबिर घेतले जाणार आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली. या बैठकीला आमदार अतुल सावे, आमदार संभाजी निलंगेकर, प्रशांत बंब, नारायण कुचे, तानाजी मुटकुळे, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, सुधीर भालेराव, भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रवक्ते शिरीष बोराळकर यांची उपस्थिती होती.
३६हजार जणांना 'समाधान'चा लाभ :वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघात आतापर्यंत तीन समाधान शिबिरे भरवून ३६९८८ जणांना योजनांचा लाभ कसा मिळवून दिला याची माहिती आमदार कुणावार यांनी दिली. विविध १८ योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीत दानवे म्हणाले, विदर्भात राबवलेला हा उपक्रम मी पाहिला आहे. त्याचे फायदे स्पष्ट होताच मी कुणावार यांना इथे बोलावले. विदर्भात महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा ३० टक्के कमी आहे तरीही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यात लोकप्रतिनिधींना यश आले आहे. त्या तुलनेत मराठवाड्यात अधिकारीही जास्त आहेत. त्यामुळे समाधान आवश्यक आहे. या वेळी त्यांनी आपलाही राजकीय प्रवास उलगडून सांगत समाधानविषयी माहिती दिली. पैठणच्या शिबिराची तयारी करा, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांवर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून 'निधीची चिंता करू नका, ते मी पाहीन,' असे त्यांनी सांगितले.
विदर्भात सर्वच चांगले!
राज्यातसर्वाधिक प्रकल्प विदर्भात सुरू आहेत. योजना प्रभावीपणे राबवण्याचे प्रमाणही विदर्भात जास्त आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आमदारांना योजना राबवायच्या कशा, याचे प्रशिक्षणही विदर्भातील आमदारांकडून घ्यावे लागत आहे याचीच चर्चा या वेळी सुरू होती.
बैठकीत फक्त भाजप आमदार
याबैठकीला शिवसेनेचे आमदार उपस्थित नव्हते. याबाबत बैठकीनंतर विचारणा करताच दानवे म्हणाले, माझ्या मतदारसंघात उपक्रम राबवण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यामुळे इतर पक्षांचा तसा संबंध नाही. अर्थात, इच्छा असेल तर सर्वच पक्ष हे समाधान शिबिर आयोजित करू शकतात. "तिकडे योजना योग्य पद्धतीने राबवल्या जात आहेत. आपल्याकडेही ही पद्धत अंगीकारली जावी या उद्देशानेच हे प्रशिक्षण आयोजित केले, असा मुद्दाही त्यांनी मांडला.
विस्तारावर मौन
मंत्रिमंडळातमराठवाड्याला जास्त संधी मिळणार का, या प्रश्नावर मात्र दानवे यांनी मौन बाळगले. 'यथावकाश सर्व होईल,' असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.