आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकांतील सिग्नलसह चार्लींच्या हेल्मेटवरही लागणार अद्ययावत कॅमेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय अति उच्च तंत्रज्ञानाने युक्त सीसीटीव्ही कॅमेरे आता शहरातील वाहतूक सुरक्षेची पाहणी करण्यासाठी सज्ज होणार आहेत. सध्या कार्यान्वित आलेल्या ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तुलनेत हे कॅमेरे पुढच्या दर्जाचे आहेत. दिवस-रात्र, ऊन-वारा-पावसातसुद्धा सेकंदाला ६० फ्रेम्स (छायाचित्र) काढण्याची क्षमता या कॅमेऱ्यांमध्ये असणार आहे. सिग्नलसह गस्तीवरील चार्लींच्या हेल्मेटवर कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. चार्लीने बटण दाबताच घटनेचे चित्रण सुरू होऊन सर्व्हर कंट्रोल रूममध्ये त्या घटनेचे फुटेज दिसणार आहे.
१२ लाख लोकसंख्येच्या शहरात साडेतीन हजार पोलिसांपैकी २५० पोलिस कर्मचारी वाहतूक शाखेत कायर्रत आहेत. दुबई, अमेरिकेत वापरले जाणारे तंत्रज्ञान शहरात वापरले जाणार आहे. यासाठी हैदराबादच्या एका खासगी कंपनीच्या माध्यमातून ४५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबवला जात आहे. बुधवारी याची चाचपणी करण्यात आली असून महावीर चौकापासून सुरुवात करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी सांगितले.
४५दिवसांनंतर शासन दरबारी प्रस्ताव : ४५ दिवस हा प्रयोग कंपनीतर्फे राबवण्यात येणार आहे. यात पोलिस प्रशासनाला सांगितलेली वैशिष्ट्ये तंत्रज्ञान कसे काम करते यासह ४५ दिवसांमध्ये केलेल्या कामाचा अहवाल सादर केला जाणार आहे. देशात पहिल्यांदाच हा प्रयोग औरंगाबाद शहरात राबवला जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
चोरीच्यागाड्या दिसताच अलर्ट : वाहतूकव्यवस्थापनासोबत रात्रीसुद्धा कॅमेरे सुरू राहणार. अपघात, चोरीचे वाहन शोधण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होणार असल्याचे पोलिस निरीक्षक के. एल. मुदिराज यांनी सांगितले. चोरी झालेल्या वाहनांची माहिती सर्व्हरमध्ये टाकली जाणार आहे. त्यानंतर सर्व्हरमध्ये चोरी गेलेल्या वाहन क्रमांक रस्त्यावर आढळून आल्यास सर्व्हर तसेच अॅपवर अलर्ट जाऊन वाहन जात असलेल्या जागेची माहिती जाईल.
ड्राेन नव्हे, सीसीटीव्ही ठेवणार नजर
या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये प्राथमिक स्तरावर १३ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे सर्व कॅमेरे रोबोटप्रमाणे काम करतील. बुधवारी महावीर चौकात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे तेथील वाहतुकीचे चित्रण करण्यासाठी केवळ ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. या संप्ूर्ण प्रोजेक्ट्समध्ये कुठेही ड्राेन वापरले जाणार नाही. नागरिकांना प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी ड्रोनद्वारे याचे चित्रण केले असे कंपनीचे प्रोजेक्ट हेड अतुल पाटील यांनी दिली.
पोलिसांना देणार अॅप
याकॅमेऱ्यांचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी कंपनीतर्फे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक अॅप देण्यात येणार आहे. ज्यात कुठल्याही वाहनचालकाचे लायसन्स, वाहनाचे स्मार्ट कार्ड स्कॅन केल्यास त्याची माहिती, अगोदर त्याच्यावर झालेल्या कारवाईची माहिती येईल. तसेच ऑनलाइन चलन, ऑनलाइन दंड भरण्यासाठी काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
असे काम करतील कॅमेरे
>पोलिस आयुक्तालयात सर्व्हर बसवून आरटीओ विभागाला जोडले जाईल. ठिकठिकाणी बसवलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होणाऱ्या दुचाकी चालकाचे छायाचित्र, माहिती, त्या ठिकाणचा गुगल मॅप, नंबर प्लेटचे छायाचित्र ते तत्काळ पोलिस आयुक्तालयातील सर्व्हरला पाठवणार.
>आरटीओ कार्यालयाकडून दुचाकी क्रमांकाची माहिती घेऊन सर्व्हरमध्ये टाकली जाईल. सिग्नल लागल्यानंतर वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येताच त्याचे छायाचित्र टिपले जाईल.
>सिग्नल लागल्यानंतर वाहनचालकाने किती वाजता सिग्नल तोडले, किती पुढे आला, वाहन क्रमांकाचा समावेश असेल. विशेष म्हणजे पुरावा म्हणून गुगल मॅप जोडून माहिती वाहतूक पोलिस तसेच सर्व्हरला पाठवली जाईल.
>भविष्यात याच वाहनचालकाने पुन्हा नियम मोडला तर पोलिसांकडे असलेल्या अॅप्समध्ये ते या वाहनचालकाने याआधीही नियम तोडल्याचा अलर्ट देईल. तसेच वाहनचालकाने दंड भरल्यास, रस्त्यावर तो वाहनचालक कॅमेऱ्यात कैद झाला तर दंड भरलेला वाहनचालक दिसल्याचा अलर्ट देईल.
बातम्या आणखी आहेत...