आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CID Arrests NCP MLA Ramesh Kadam In Corruption Case

कदमांशी संबंधित काही नेते, उद्योजक अडचणीत, अटकेच्या शक्यतेने गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी महामंडळाचे अध्यक्ष आमदार रमेश कदम यांना अटक होताच त्यांच्याशी संबंध असलेले शहरातील काही राजकीय नेते, उद्योजक व दलालांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

महामंडळाचा पैसा परस्पर वापरून कोट्यवधींच्या जमिनी घेऊन देणाऱ्या दलालांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता आहे. मजुरांच्या नावावर आलिशान गाड्या उचलून त्या वापरणाऱ्या काही नेत्यांवरही कारवाई होऊ शकते.
आमदार रमेश कदमांना अध्यक्षपदाच्या कार्यकाळात २५० कोटींचा कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी सोमवारी अटक झाली. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित शहरातील काही मंडळींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक संजीव घाडगे यांनी पाेलिसांकडे दिलेल्या लेखी जबाबामध्ये उल्लेख झालेली औरंगाबादमधील दोन प्रकरणे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली आहेत. त्यापैकी पहिल्या प्रकरणात औरंगाबादचे उद्योजक अमरदीपसिंग सेठी यांच्या मालकीच्या मैत्री शुगर ट्रेडिंग कंपनीत एकही मातंग समाजाचा सदस्य नसताना वैजापूरजवळील विनायक सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी मुख्यालयास सादर केला. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी महामंडळाच्या खात्यातून ३० कोटी रुपये सिंग यांच्या कंपनीच्या खात्यात जमाही केले. कारखाना घेणे गरजेचे असताना त्यापैकी २५ कोटी रुपये कदमांच्या मालकीच्या मुंबईच्या पेडर रोडवरील कोमराल (हबटाऊन) कंपनीच्या नावे वर्ग केले. उर्वरित पाच कोटी रुपयांत सिंग यांची मैत्री शुगर कंपनी कदमांचे निकटवर्तीय कमलाकर ताकवाले व रामेश्वर गाडेकर यांच्या नावावर खरेदी केली. प्रत्यक्षात महामंडळाचा पैसा शहरातील उद्योजक सिंग यांनी वापरून कदम यांच्या गैरव्यवहारात मदत केल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सीआयडीने सिंग यांचा जबाबही घेतला आहे. मात्र, त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

दुसऱ्या प्रकरणात कदम यांनी औरंगाबादेत एमपीएससी व यूपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी जालना रोडवर पवनदीप कोहली व ध्रुव पित्ती यांच्याकडून दोन एकर जागा विकत घेतली. या व्यवहारातही घोळ झाला असून कोहली हे कदमांसाठीच मालमत्तेचे व्यवहार करतात. जमिनीचा खरेदी व्यवहार होण्यापूर्वीच २१ सप्टेंबर २०१३ रोजी कोहली यांच्या महेंद्र इंटरप्रायजेसच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. प्रत्यक्षात या जमिनीचा व्यवहार वर्षभरानंतर म्हणजेच १३ सप्टेंबर २०१४ रोजी झाला. ही जमीन महामंडळाच्या नावे करण्याऐवजी गट क्र. १६ फत्तेपूर, औरंगाबाद येथे २० गुंठे जमीन महामंडळाच्या नावे व उर्वरित दीड एकर जमीन कदम यांच्या वैयक्तिक नावे दाखवण्यात आली. कोहली यांनी तिसरा जमिनीचा व्यवहार नाशिकच्या अंबड एमआयडीसीच्या भूखंड क्र. डब्ल्यू २४९ चा करून दिला. या सर्व व्यवहाराच्या नोंदीमध्ये गडबड असून यामध्ये कदमांचेच निकटवर्तीय उद्योजक व दलाल येतात.

कदम यांच्या अटकेमुळे सीआयडीने घेतलेल्या जबाबानुसार या सर्व प्रकरणांत शहरातील संबंधित उद्योजकांनी कबुली दिली असली तरी त्यानंतर काही कारवाई झालेली नाही. आता या सर्वांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते या भीतीने सर्वजण बचावासाठी प्रयत्न करत आहेत. संबंधित दोन्ही उद्योजकांनी त्यांची बाजू स्पष्ट केली.
‘त्या’ जमीन विक्रीवर बंदी
कदम यांनी औरंगाबादसह राज्यात घेतलेल्या मालमत्तेचा तपशील सीआयडीने जप्त केला आहे. सरकारी पैशावर खासगी नावाने घेतलेल्या जमिनी इतरांना विक्री करू नये, अशा नोटिसा संबंधितांना बजावल्या आहेत. प्रत्यक्ष संबंध येणाऱ्यांवरही लवकरच गुन्हे नाेंदवू.
- संजयकुमार, महासंचालक, सीआयडी, मुंबई

चौकशीला मदतच करू
३० कोटी रुपये माझ्या खात्यावर दिले. मात्र, वैजापूरच्या साखर कारखान्याचा व्यवहार न झाल्याने ती रक्कम मी कदमांच्या कोमराल कंपनीस दिली. सीआयडी चौकशीत मी बाजू मांडली आहे. जे होईल त्यास सामोरे जाऊ.
-अमरदीपसिंग सेठी, उद्योजक, औरंगाबाद

सामोरे जायला तयार...
औरंगाबादचा जमीन व्यवहार आपण केला असून नाशिकच्या अंबड एमआयडीसीमधील भूखंडाशी माझा संबंध नाही. मीदेखील सीआयडीला सामोरा गेलो आहे. कदमांच्या अटकेनंतर आमच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
- पवनदीपसिंग कोहली, उद्योजक