आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको उड्डाणपूल - संतप्त आंदोलकांकडून प्रशासनाचा निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको बसस्थानक चौकात सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम ठाकरेनगरच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे, त्यांचे पती माजी नगरसेवक दामोदर शिंदे व स्थानिक नागरिकांनी दुपारी १२ ते सायंकाळी चार या वेळेत बंद ठेवले.
बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम तत्काळ करून देणार या आश्वासनाचे पालन न झाल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. १५ दिवसांत हे काम सुरू करून रस्ता चांगला करून दिला जाईल, असे आश्वासन रस्ते विकास महामंडळ तसेच ठेकेदाराच्या वतीने देण्यात आल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हॉटेल रामगिरी चौक ते पुढे एपीआय कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचा हा वाद आहे. पुलाचे काम सुरू असल्याने वाहनधारक शेजारच्या सर्व्हिस रोडचा वापर करतात. अवजड वाहनांमुळे हा रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे जमाव संतप्त झाला अन् हे आंदोलन ऐनवेळी हाती घेण्यात आले.

निवेदनाकडे दुर्लक्ष
८ महिन्यांपासून सिडको बसस्थानक चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. त्यामुळे बाजूच्या सर्व्हिस रोडचा वापर होणार हे नक्की होते. अवजड वाहनेही याच रस्त्याने जातील हेही स्पष्ट होते. त्यामुळे आधी या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी या वॉर्डाच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी केली होती. लवकरच रस्त्याचे काम होईल, असे महामंडळ तसेच ठेकेदाराने सांगितले होते.
परंतु सहा महिन्यांनंतरही काम झाले नाही. त्यामुळे शिंदे यांनी निवेदन दिले होते. अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर चालणेही मुश्कील झाल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अंतिम इशारा दिला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले.
दुपारी १२ ते ४ काम बंद
आंदोलनाचा इशारा देऊनही प्रत्यक्षात काहीच न झाल्याने सुमारे दीडशेवर नागरीक पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी कामगारांना काम बंद करण्यास सांगितले. जमाव बघून काम बंद झाल्यानंतर एमएसआरटीसीचे अधिकारी तसेच ठेकेदाराचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विनंती केली.
मात्र आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यानंतर ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांनी नमते घेतले. शेवटी १५ दिवसांत हा रस्ता करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नागरिकांना जगणे असह्य
^पुलाच्या कामामुळे सर्व वाहतूक सर्व्हिस रोडवर वळते. तोच रस्ता चांगला नाही. त्यामुळे त्याचे काम आधी करावे, अशी सूचना आम्ही केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. येथील नागरिकांना जगणेच असह्य झाले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. येत्या १५ दिवसांत हा रस्ता झाला नाही तर पुन्हा काम बंद पाडू. सत्यभामा शिंदे, नगरसेविका.

सातारावासीयांचा मोर्चाद्वारे एल्गार
सातारा-देवळाईत प्रशासन मूलभूत सुविधा देण्याऐवजी अतिरिक्त बांधकाम पाडत आहेत. या कारवाईवर केला जाणारा खर्च सुविधा देण्यासाठी वापरला तर परिसराचा विकास होईल. त्यामुळे, पाडापाडी थांबवून सर्वांचीच बांधकामे नियमित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली. पाडापाडीच्या धास्तीत असलेल्या रहिवाशांनी मोर्चाद्वारे एल्गार करत प्रशासनाला जाब विचारला.
महिनाभरापासून अतिरिक्त बांधकामावर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने शनिवारी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
रहिवाशांना पाठवलेल्या नोटिसाच चुकीच्या असून सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच घरे विकत घेतलेली आहेत. एनए ४७ साठी शासनाच्या सूचनेप्रमाणे रक्कम भरलेली आहे. मात्र, पाडापाडीमुळे नुकसान होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच मोर्चा येणार असल्याचे माहीत असून सुद्धा प्रशासक विजय राऊत कार्यालयात अनुपस्थित राहिले. मुख्याधिकारी कायंदे मात्र, उपस्थित हाेते. यावर आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

इतरही मागण्या मांडल्या
मोर्चातील रहिवाशांनी पाणीपुरवठा, रस्ते, खुल्या जागा आणि नाल्यांवरचे अतिक्रमण आदी समस्यांवर प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सर्व मागण्यांचा विचार करण्यात येईल. बांधकाम कारवाईसंदर्भात सामान्य माणसाच्या भावनांचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू अाणि योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. या वेळी साताऱ्याचे माजी सरपंच फिरोज पटेल, करीम पटेल, अशोक पिंगुटे, सोमनाथ शिराणे, जावदे पटेल, सुवर्णा पाटील, रोहन पवार उपस्थित होते.
ते बिल्डरच नसल्याचा दावा
प्रशासन बिल्डर, बांधकाम व्यावसायिकांच्या नावाखाली सर्वांचीच घरे पाडत आहे. प्रशासन ज्यांचे बांधकाम पाडत आहे ते मुळात बिल्डर नसून काही नागरिकांनी एकत्र येऊन अपार्टमेंट, घरे बांधलेली आहेत. ते बिल्डरही नाहीत किंवा ती घरे व्यावसायिकदृष्ट्या बांधलेलेही नाही. याअर्थी प्रशासन सामान्य नागरिकांच्याच घरावर कारवाई करत असल्याचा दावा करण्यात आला.