आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांत बंद होणार सिडको एन-4 मधील नाल्याची दुर्गंधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उच्चभ्रू आणि उच्चशिक्षितांची वसाहत असलेल्या सिडको एन-3, एन-4 मधील नागरिक नाल्याच्या दुर्गंधीने हैराण झाले आहेत. सोबत डासांचाही छळवाद आहे. ही समस्या येत्या तीन महिन्यांत सोडवण्याची ग्वाही नगरसेवक प्रमोद राठोड यांनी रविवारी दिली.
‘दिव्य मराठी’च्या विकास मंच अभियानात नागरिकांनी नाल्यामुळे होणार्‍या त्रासाची माहिती दिली. याची दखल त्यांनी घेतली आहे.
एन-3 येथील किटली गार्डनमध्ये आयोजित या अभियानात नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. औरंगाबादच्या विकासाचे प्रश्न मांडण्याची संधी अभियानाद्वारे दिल्याबद्दल राठोड यांच्यासह नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. राठोड म्हणाले की, अग्रसेन भवन, एन-5 येथून किटली गार्डनकडे येणार्‍या नाल्यात एन-5 भागातील नागरिकांनी ड्रेनेज लाइन्स सोडल्याने माझ्या वॉर्डातील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यासाठी मी यापूर्वीही पाठपुरावा केला आहे. एच सेक्टरमधील अनेक घरांना कमी दाबाने पाणी येत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. या वेळी ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे, उपअभियंता पी. जी. पवार, वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे, शाखा अभियंता एस. डी. राठोड, स्वच्छता निरीक्षक कमलाकर ज्ञाते उपस्थित होते.