आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको कार्यालयातील मुजोर कार्यपद्धती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील भ्रष्ट व ढिसाळ कारभाराची अनेक प्रकरणे डीबी स्टारने याआधी उघड केली आहेत. येथील संपूर्ण व्यवस्थाच ढासळली असून कामे न करता अधिकारी-कर्मचारी सर्वसामान्यांची कशी पिळवणूक करतात, याचा आता पर्दाफाश करत आहोत. साध्या साध्या कामासाठी टोलवाटोलवी करणे, एकमेकांवर जबाबदारी ढकलणे, फाइल्स गहाळ करणे आणि वर नागरिकांशी मुजोर भाषेत बोलणे..ही सिडकोतील कामाची पद्धतच झाली आहे. तीन सामान्य नागरिकांचा साध्या कामासाठी कसा छळ करण्यात आला हे प्रातिनिधिक स्वरूपात मांडतानाच चमूने चार कर्मचार्‍यांचे स्टिंग करून हा मुजोरपणा उघड केला आहे.

सिडकोत याआधी डी. डी. वळवी हे मुख्य प्रशासक, तर सुधाकर तेलंग हे प्रशासक होते. सामान्य लोकांना चकरा मारायला लावून त्यांना छळणे हेच काम सिडकोचे अधिकारी अन् कर्मचारी करीत असतात. त्याची दखल सिडकोत दुसर्‍यांदा नव्याने रुजू झालेले व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी घेतली. त्यांनी ‘आता तरी सुधरा, नाहीतर जेलमध्ये जा,’ असा इशाराच दिला होता. पण भाटियांची पाठ फिरताच सिडकोचा कारभार ‘जैसे थे’ सुरू झाला. आता नवीन मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर आले आहेत. त्यांच्या कामाची घडी बसायची आहे. त्यामुळेच ही अनागोंदी अद्यापही सुरू आहे.

शहरातील सर्वसामान्य नागरिक उदयकुमार सोनोने, सचिन एकबोटे, विश्वास शिंदे या तिघांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर चमूने स्टिंग करण्याचा निर्णय घेतला. सोनोने यांना प्लॉट विक्रीसाठी एनओसी मिळत नाही, तर एकबोटे यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या ऑडशेप जागेसाठी अर्ज केला आहे. त्यांची 4 वर्षांपासून टोलवाटोलवीच सुरू आहे. शिंदे यांनी बंगला एन-3 भागात बांधला. केवळ काही चौरस फूट बांधकाम कमी केले म्हणून त्यांना तब्बल 2 लाख रुपये अँडमिशन प्रीमियम भरा म्हणत तब्बल 22 वर्षांनी नोटीस पाठवली. ही झाली काही प्रातिनिधिक उदाहरणे. इतरांचा कसा छळ होतो, नेमक्या अडचणी काय, गौडबंगाल काय, जबाबदार कोण हे स्टिंग ऑपरेशनमधून उघड करत आहोत.

नोटिसा देण्याची घाई
सिडकोत खुलेआम भ्रष्टाचार सुरू असल्याचे अनेक किस्से नागरिक सांगतात. सुनील केंद्रेकर मुख्य प्रशासक म्हणून नियुक्त होताच येथील अनेक भ्रष्ट अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. केंद्रेकर साहेब यायच्या आत काहीतरी कमाई व्हावी या हेतूनेच अँडिशनल लीज प्रीमियमच्या नोटिसा केंद्रेकर रुजू होण्याआधी काढण्यात आल्या आहेत, असा आरोप शहरातील काही नागरिकांनी केला आहे. त्याचे पुरावेदेखील नागरिकांनी दाखवले.

काय आहेत सिडको कार्यालयातील कामाच्या त्रुटी
1>1985 नंतरची भोगवटा प्रमाणपत्रे अजूनही अडकवून ठेवली आहेत.
2> अँडिशनल लीज प्रीमियमसाठी नागरिकांचा विनाकारण नोटिसा पाठवून छळ केला जातो.
3> प्रीमियम का मागितला जातोय, याचे कारणही दिले जात नाही.
4> कोणतीही माहिती ऑनलाइन दिली जात नाही.
5> कर भरूनही सिडको वाळूज महानगरात सुविधा नाहीत.
6> एक खिडकी तक्रार निवारण कक्षच नाही.
7> काम कधी होईल, याची नियमावली नाही
8> अधिकारी बदलला की नियम बदलतात.
9> फायली सतत वाळूज ते औरंगाबाद कार्यालय अशा फिरत राहतात. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट होते.
10> व्हीआयपी लोक आणि पैसेवाल्यांचे काम लवकर होते. सामान्य माणसाला मात्र चकरा माराव्या लागतात.
11> अधिकारी-कर्मचारी कामासाठी येणार्‍यांशी अरेरावीने वागतात
12> सामान्य माणसांना मुख्यालयात वाहन लावू दिले जात नाही.
13> साहेब कुठे गेले, कधी येतील याची माहिती कुणीच देत नाही
14> सिडकोच्या रिकाम्या प्लॉटची तसेच नवीन प्रकल्पांची ऑनलाइन नोंद नाही.

..तर मला भेटा
मी एक महिन्यापूर्वीच पदभार स्वीकारला आहे. पूर्वीच्या अडचणी दूर केल्या आहेत. फायली नियमितपणे क्लिअर केल्या जातात. फक्त बांधकाम परवानगीच्या फाइल शहरात जातात. एफएसआय रेटचा निर्णय झाला की त्यालाही गती येईल. तरीही कोणालाही कोणतीही अडचण असेल तर थेट मला भेटावे. - पंजाबराव चव्हाण, प्रशासक, सिडको (वाळूज)

काय म्हणतात नागरिक
माझ्या घराशेजारी फक्त 250 चौरस मीटरची ऑडशेप जागा मला हवी. त्यासाठी 4 वर्षांपूर्वी मी अर्ज केला. पण त्याचा सर्व्हे करायला वेळ मिळत नाही. सिडकोच्या औरंगाबाद व वाळूज कार्यालयात चकरा मारून मी कंटाळलो आहे. - सचिन एकबोटे

माझे काम दोन महिन्यांपासून अडकले आहे. सिंगल विंडो कारभार करून सर्व प्रक्रिया ऑनलाइन करावी. पण सिडकोत ते शक्य नाही. कारण येथे एजंट व अधिकार्‍यांचे साटेलोटे आहे. माजी मुख्य प्रशासक वळवी यांच्या काळात नियम डावलून अनेक कामे झालेली आहेत.
- उदयकुमार सोनोने

मी सिडको एन-3 मध्ये 20 वर्षांपूर्वी घर बांधले. आता वरच्या मजल्याचे बांधकाम करायचे आहे. त्याची एनओसी अडवली. 1985 मध्ये सिडकोने मंजूर केलेल्या क्षेत्रफळाएवढे बांधकाम केलेले आहे, परंतु नवीन नियमानुसार ते 100 चौरस फूट कमी आहे. सिडकोकडून फाइल गहाळ झाल्याने पत्र मिळत नाही. - विश्वास शिंदे

स्टिंग 1
ए. जे. बोरसे, सहायक अभियंता, वाळूज कार्यालय
प्रतिनिधी- साहेब, ही कागदपत्रे आहेत. तरीही मला प्लॉट विक्रीसाठी एनओसी मिळत नाही. तुम्हाला मी दोन वेळा भेटलो आहे.
बोरसे- आता माझ्याकडे ती फाइल नाही. आत्ताच सिडकोच्या औरंगाबाद कार्यालयात पाठवली.
प्रतिनिधी- मग आमच्या एनओसीचे काम कधी होईल?
बोरसे- तुम्ही आता औरंगाबादच्या कार्यालयातच चौकशी करा.
प्रतिनिधी -काम किती दिवसांत व्हायला हवे याची कालर्मयादा असलेला लेखी कागद मिळेल का?
बोरसे- नाही असा कुठलाही नियमाचा कागद सध्या माझ्याकडे नाही. मुख्यालयातूनच मिळवा.

स्टिंग 2
एस. पी. देशपांडे, आरेखक
प्रतिनिधी-माझ्या घरालगतच्या ऑडशेप जागेसाठी अर्ज करून 4 वर्षे झाली, पण काम होत नाही..
देशपांडे -मी नवीन आलोय. तुमची फाइल असेल तर शोधतो.
प्रतिनिधी-औरंगाबाद सिडको कार्यालयातील साहेब सांगतात, फाइल इकडे वाळूजलाच पाठवली.
देशपांडे-मी नुकताच चार्ज घेतलाय. आधीचे माहिती नाही.
प्रतिनिधी-माझे काम कधी होईल?
देशपांडे- नियमाप्रमाणे आठ ते दहा दिवसांत व्हायला पाहिजे.
प्रतिनिधी-मग का होत नाही? आता चार वर्षे झाली.
देशपांडे-माझ्याकडे वाळूजसह औरंगाबादचे काम आहे. तेथील अधिकार्‍याला मला सव्र्हेला साइटवर घेऊन जाताना तारांबळ होते. कारण त्यांचा व माझा वेळ जमला पाहिजे. इतक्या लांब जाऊन त्यांना वेळ नसला की चक्कर वाया जाते. हे काम वेळ घेऊन समन्वयानेच करावे लागते.

स्टिंग 3
निर्मलकुमार गोलखंडे, डेप्युटी प्लॅनर, वाळूज
प्रतिनिधी-साहेब, मला प्लॉट विकायचा आहे. सर्व कायदेशीर कागदपत्रे असून मी दोन महिन्यांपूर्वी एनओसीसाठी अर्ज केला आहे..
गोलखंडे- मला तुम्हाला एनओसी देता येणार नाही. त्याचा अभिप्राय मी वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्यामुळे तुम्ही आमचे साहेब उईके यांना भेटा.
प्रतिनिधी - पण एकाला एनओसी मिळते तर मला का नाही? हा काय प्रकार आहे?
गोलखंडे -त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. वरिष्ठांनाच विचारा. ही जी तुम्ही दुसर्‍याची एनओसी दाखवताय ती होऊच शकत नाही. ती कायद्याने बरोबर नाही. आता हेच बघा ना, सिडकोचा एफएसआय दीड झाला आहे. त्याचा प्रीमियम अजून ठरलेला नाही. तरी काही लोकांना तो मंजूर केला, काही लोकांचे काम मात्र अजूनही लटकले आहे.
प्रतिनिधी- हा तर भयंकर प्रकार आहे.
गोलखंडे - काय करणार? मी लहान माणूस आहे.
प्रतिनिधी - माझे काम कधी आणि किती दिवसांत होईल ते सांगा. काही नियमावली आहे काय?
गोलखंडे - नियमावली आत्ता माझ्याकडे नाही, पण मी एक काम करतो. काही सूचना तुमच्या म्हणण्याप्रमाणे तत्काळ नोटीस बोर्डावर लावू शकतो. खरे सांगायचे तर आमच्या कार्यालयात अधिकारी बदलले की नियम बदलतात. त्यात मधल्यामधे आमच्यासारख्या कर्मचार्‍यांचे मात्र मरण होते.
प्रतिनिधी - तुम्ही ऑनलाइन माहिती का देत नाही? रिकाम्या भूखंडाचीही माहिती मिळत नाही..
गोलखंडे- काहीच ऑनलाइन नाही. सिडको वाळूजच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणे होण्याचा धोका आहे. त्याचा विकासही कुणी करीत नाही. सर्व गोंधळ आहे.

स्टिंग 4
आशुतोष उईके, वरिष्ठ नियोजनकार
प्रतिनिधी-साहेब, मला एनओसी किती दिवसांत मिळायला हवी याची नियमावली द्या.
उईके-आत्ता माझ्याकडे उपलब्ध नाही. मला बघावी लागेल.
प्रतिनिधी-सर, आपण वरिष्ठ नियोजनकार आहात..नियम माहिती नाही असे कसे म्हणता?
उईके- सर्वच नियम तोंडपाठ नसतात.
प्रतिनिधी- हे माझे काम किती दिवसांत व्हायला पाहिजे?
उईके- दोन दिवसांत व्हायला पाहिजे, परंतु त्याची कालर्मयादा निश्चित नाही.