आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधी क्रीडा संकुलाची दुर्दशा; दिवसा पार्किंग, रात्री बार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडको एन 5, एन 6 च्या नागरिकांसाठी असलेल्या राजीव गांधी क्रीडासंकुलावर क्रीडा स्पर्धा, सामने सोडून इतरच खेळ रंगत आहेत. दिवसा ‘खासगी ट्रॅव्हल्स’च्या बसचे पार्किंग, भिंत फोडून मैदानातून शॉर्टकट, सार्वजनिक स्वच्छतागृहासारखा क्रीडांगणाच्या भिंतींचा उपयोग, रात्री मोकळय़ा हवेत मद्यपान, जुगार यासाठीच हे स्टेडियम उरले आहे. मनपाने तयारी दर्शवल्यास आणि तो प्रस्ताव परवडण्यासारखा असल्यास या मैदानाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी व्यापार्‍यांनी दाखवली आहे.

22 वर्षांपूर्वी सिडको एन 5 आणि एन 6 भागातील नागरिकांना क्रीडांगण मिळावे म्हणून राजीव गांधी स्टेडियम तयार करण्यात आले. प्रारंभीचा काही काळ वगळता या भरवस्तीतील मैदानाचा गैरवापरच मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला. वर्षभरात एखाद-दुसरी स्पर्धा वगळता इतरच कारणांसाठी या मैदानाचा वापर होत असतो. गणेशोत्सवात मंडळाचा मंडप, नवरात्रात दांडिया, दिवाळी आधी फटाका मार्केट असा या मैदानाचा नियमित वापर असतो, पण उर्वरित काळात मात्र इतर खेळच होतो.

खासगी पार्किंग

या मैदानावर भावना ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसचे पार्किंग स्टँड बनले आहे. चार ते पाच बसेस तेथे रोज उभ्या असतात. तेथेच या बसेसच्या दुरुस्ती देखभालीचे काम होत असते. मैदानाचा एक मोठा कोपरा त्यांनी व्यापून टाकला आहे. शिवाय या मैदानाच्या भिंतींचा चक्क सार्वजनिक स्वच्छतागृहांसारखा वापर सतत सुरू असतो. परिणामी येथे कायम दुर्गंधीचे साम्राज्य असते. चिश्तीया कॉलनी ते बळीराम पाटील शाळेपर्यंतच्या रस्त्यावर कोठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने या आडोशाचा सर्रास वापर होत आहे.

चक्क शॉर्टकट

स्टेडियमची संरक्षक भिंत पाडून तेथून रस्ताच करण्यात आला आहे. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून दुचाक्या, रिक्षा, कार मैदान ओलांडत थेट पलीकडच्या वसाहतीत ये जा करीत असतात. स्टेडियमच्या बाजूने असलेला रस्ता टाळून चक्क शॉर्टकट म्हणूनच मैदानाचा वापर सुरू झाला आहे.

संध्याकाळी ओपन एअर बार
दिवसभर पार्किंग, स्वच्छतागृह, शॉर्टकट असा वापर होणार्‍या या मैदानाचे रात्री ओपन एअर बारमध्ये रूपांतर होत असते. स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीवर मद्यपींचा हा बार सुरू असतो. जवळच्या वाइन शॉप्समधून बाटल्या आणून येथे रात्री उशिरापर्यंत मद्यपान करीत बसणार्‍यांची टोळकी पाहायला मिळतात. प्रेक्षक गॅलरीत बाटल्यांचे ढिगारे, फोडलेल्या बाटल्यांच्या काचा पाहायला मिळतात. या शिवाय भरवस्तीत एकांत देणारी जागा असल्याने दिवसा आणि रात्रीदेखील मैदानाच्या कोपर्‍यात जुगार्‍यांचे अड्डे बसलेले असतात.

नागरिकांना त्रास
एन 5 आणि एन 6 भागात राहणार्‍या नागरिकांना सर्वाधिक त्रास होतो. हिरवळीचा पत्ता नसणार्‍या या मैदानावर दिवसा इतर भागातील मुले, तरुण क्रिकेट खेळतात. मैदानाच्या मध्यभागातून शॉर्टकट असल्याने एका कोपर्‍यात त्यांचे सामने रंगतात. मात्र, त्यावरून शेजारी राहणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. चेंडू आवारात येणे, नागरिकांना लागणे, त्यानंतर भांडणे असे प्रकार नेहमीच सुरू असतात. नागरिकांनी तक्रारी करूनही हा त्रास थांबलेला नाही.