आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको कर्मचार्‍यांची मधुशाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहर हिरवे करण्यासाठी रोपे वितरित करण्याची जबाबदारी असणार्‍या सिडकोच्या रोपवाटिकेतच होळीच्या पार्श्वभूमीवर झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. तब्बल 55 झाडे तोडण्यात आली. आणखीही उरलेली झाडे तोडली जाणार असल्याच्या खुणा येथे दिसत आहेत. त्याबाबतचे वृत्त डीबी स्टारने 21 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध केले. ही कत्तल थांबावी व या प्रकाराला आळा बसावा या हेतूने चमूने पुन्हा दुसर्‍या दिवशी संध्याकाळी तेथे साडेसहाच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा ही नर्सरी नसून मधुशाला झाल्याचे उघड झाले.

कार्यालय नव्हे, ‘परमीट’ रूम

डीबी स्टारने मंगळवारी पहिला छापा घातला तेव्हा परिसरात दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य आढळले, मात्र बुधवारी सिडको नर्सरीच्या कार्यालयातच देशीचे ग्लास रिकामे होत होते. याचे यजमान ज्यांच्या खांद्यावर नर्सरीची जबाबदारी आहे ते माळी के. डी. जाधव स्वत: होते. 36 वर्षांपासून माळी म्हणून काम पाहणारे जाधव त्यांच्या चार मित्रांसोबत येथे मनसोक्त मद्यप्राशन करत बसले होते. यात सिडकोच्या एका ड्रायव्हरचा समावेश होता. देशी दारूची बाटली, ग्लास, टेबलावर चकना, क ाड्यांची पेटी आणि विड्यांचे बंडल पडलेले होते. सोबतीला पत्याचा कॅट होता. चमूला बघताच अन्य चौघांनी तेथून पलायन केले, तर झिंगलेले जाधव सिडकोचे अधिकारीच वृक्षतोडीसाठी कसे जबाबदार आहे, हे पटवून देण्याचा भक्कम प्रयत्न करत होते. नर्सरीच्या संवर्धनासाठी सिडको प्रशासनाकडे केलेला पत्रव्यवहारही त्यांनी दाखवला. योग्य वेळ पाहून त्यांनी बाटली आणि ग्लास खिडकीतून बाहेर फेकून दिले; पण तोवर आमच्या कॅमेर्‍याने या सर्व बाबी टिपल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी दुपारीही चमूने पाहणी केली तेव्हा पुन्हा मद्यपींची ‘शाळा’ भरलेली होती. सिडकोचे कर्मचारीच येथे मधुशाला उघडणार असतील तर नर्सरीकडे कोण लक्ष देणार, हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून माळी असलेल्या जाधव यांना नर्सरीत किती झाडे आहेत याचीसुद्धा माहिती नाही.
..तर आंदोलन करणार
या नर्सरीत खुलेआम झाडांची कत्तल होते. दारूच्या पाटर्य़ा रंगतात. अनैतिक प्रकारही चालतात. बाजूच्या मंदिराचे पावित्र्यही यामुळे नष्ट होते. या भागातील नगरसेवक म्हणून मी दोन वेळा पत्राद्वारे, तर अनेकदा तोंडी सिडको प्रशासक तेलंग यांना माहिती दिली होती. पण, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता मात्र अतिच झाले आहे. सिडकोने येथील गैरप्रकार थांबवले नाहीत तर आम्हाला आंदोलन करावे लागेल.
मोहन मेघावाले, नगरसेवक, एन-12
थेट सवाल
के. बी. जाधव
नर्सरीतील माळी
अधिकारी लक्षच देत नाहीत
*येथे किती झाडांची कत्तल झाली?
एकही झाड तोडलेले नाही. साहेब लोकांना आज पाहणी केली. सर्व झाडे बरोबर आहेत, कुठेच काही झाले नाही.
*या ठिकाणी किती झाडे आहेत?
माहिती नाही. त्याबाबत सांगता येणार नाही.
*असे कसे होईल, झाडांची नोंद असेल ना..
नाही, कुठलीच नोंद नाही.
*ही तर तुमची जबाबदारी आहे. का ठेवत नाही नोंद?
खूप झाडे आहेत साहेब. काय नोंद ठेवणार?
*तुम्ही किती वर्षांपासून सिडकोत काम करता, कोणत्या पदावर आहात?
साहेब, मी माळी आहे. 1974 ला लागलो. 1978 ला कायम झालो. मला प्रमोशन नाही, काही नाही. मला कार्यालयात बसू देत नाहीत.
*इथे खूप झाडांची कत्तल झाली आहे, आमच्याकडे फोटो आहेत.
साहेब, ती जुनीच झाडे होती. तीच तोडली आहेत.सुरक्षारक्षकही नाहीत. मी पत्र दिलेत.
*पत्र कधी लिहिले, त्यात काय मागणी केली?
मी सन 2012 व आता 2013 मध्येही थेट प्रशासकांनाच पत्र लिहिले आहे. यात तीन सुरक्षारक्षक मागितले आहेत. दिवसा मी अन् दोन माळी (महिला) आहेत, पण रात्री मात्र येथे कोणीही सुरक्षेला नाही.
*तुम्ही आत्ता काय करत होता? तुमची पार्टी सुरू आहे .
साहेब, त्या बाटलीचा फोटो काढू नका. मी या जंगलात एकटा राहतो, कोणी मदतीला नाही. म्हणून मित्रमंडळीसोबत थोडं बसलो होतो..
*हे बाकीचे पाच लोक कोण होते .
मित्र आहेत साहेब. त्यातला एक सिडकोचा ड्रायव्हर आहे.