आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेसाठी उद्योजकांचा घेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वीज नसल्यामुळे दोन दिवसांपासून चिकलठाणा एमआयडीसीमधील दीडशेपेक्षा जास्त उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे जवळपास 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जीटीएलची यंत्रणा बेजाबदारपणे काम करत असल्याचे वास्तव उघड झाल्यामुळे बुधवारी पाहणी करण्यासाठी गेलेल्या जीटीएलचे उपाध्यक्ष राकेश सिन्हा यांना उद्योजकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वीज गुल झाली. काही भागांत दोन तासांत, तर काही भागांत वीस तासांनंतर वीज परत आली. मात्र, चिकलठाणा एमआयडीसीमध्ये दोन दिवस उलटल्यानंतरही वीज आली नसल्यामुळे एमआयडीसीमधले उद्योग ठप्प झाले आहेत.

दीडशे कंपन्यांचे व्यवहार ठप्प : सोमवारी रात्री वीज गेल्यानंतर बुधवारीदेखील एमआयडीसीमधील वीज परत आली नाही. या परिसरात मोठय़ा प्रमाणात झाडे तुटल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या आहेत, तर खांबदेखील पडले आहेत. वीज नसल्यामुळे उद्योजक हवालदिल झाले असून काम बंद असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कंपन्या बंद असल्यामुळे जवळपास 100 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मसिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे यांनी केला आहे.

काम धिम्या गतीने : वीज गेल्यानंतर झाडे उचलण्यासाठी तसेच खड्डे खोदणे, पोल उचलणे यासाठी अत्याधुनिक यंत्रे जीटीएलने वापरली नाहीत. अतिशय धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे उद्योजक संतापले. चिकलठाणा परिसरात छोट्या पहारीच्या साहाय्याने खड्डे खोदणे, कुर्‍हाडीच्या साहाय्याने झाड तोडणे आणि खोर्‍याच्या साहाय्याने माती उचलण्याचे काम सुरू आहे. क्रेन, जेसीबी अशी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे उद्योजक संतप्त झाले. जर हेच काम मशिनरीच्या साहाय्याने झाले असते, तर चार तासांत वीज सुरू झाली असती, असे उद्योजक अनुप काबरा यांनी सांगितले.
जीटीएलच्या उपाध्यक्षांना घेराव : या वेळी जीटीएलचे उपाध्यक्ष राकेश सिन्हा यांना उद्योजकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. उद्योजकांनी त्यांना घेराव घालत जीटीएलला जमत नसेल, तर औरंगाबाद सोडा, आमच्या शांततेचा अंत पाहू नका, नाही तर जीटीएलचे ऑफिस फोडून टाकू, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. जीटीएलमुळे नुकसान होत असल्याचा आरोपही उद्योजकांनी केला. त्यानंतर सिन्हा यांनी त्यांना पाच वाजेपर्यंत वीज सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.

रात्री उशिरा वीजपुरवठा : उद्योजकांनी जीटीएल अधिकार्‍यावर रोष व्यक्त केल्यानंतर जीटीएल अधिकार्‍यांनी तातडीने पावले उचलत रात्री 8.30 वाजता चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.