आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीस टँकर्सची हवा सोडली,एन-५ च्या टाकीवर नागरिकांचा हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको एन-५ येथील  जलकुंभ परिसरात नागरिकांनी पाण्यासाठी ठिय्या दिला.  दुसऱ्या छायाचित्रात चाकांतील हवा सोडलेली स्थायी सभापतींची कार. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
सिडको एन-५ येथील जलकुंभ परिसरात नागरिकांनी पाण्यासाठी ठिय्या दिला. दुसऱ्या छायाचित्रात चाकांतील हवा सोडलेली स्थायी सभापतींची कार. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद - अखेर 'समांतर' विरुद्धच्या असंतोषाचा स्फोट झालाच. पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहणा-या नागरिकांनी सहाव्या दिवशीही पाणी न आल्याने एन-५ च्या पाण्याच्या टाकीवर धाव घेत संतापाला वाट करून दिली. कार्यालयाची मोडतोड करीत खुर्च्या, टेबल बाहेर फेकून दिले व नंतर बाहेर उभ्या असणा-या ३० ते ४० टँकरची हवा सोडून दिली.

दीडशे नागरिकांचा जमाव हिंसक बनत असल्याचे पाहताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांची मोठी तुकडी तेथे दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यात मनपा व समांतरला अपयश आल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उद्या सकाळी ११ वाजता पोलिसआयुक्त अमितेशकुमार यांनीच सर्वांची बैठक बोलावली आहे.

समांतरकडे शहराचा पाणीपुरवठा गेल्यापासून औरंगाबादकरांचे हाल सुरू आहेत. नागरिकांचा संताप उफाळूनही कंपनीचा कारभार न सुधारल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचे गेल्या महिनाभरातील घटनांवरून दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी शहागंजची पाण्याची टाकी दोन नगरसेवकांनी ताब्यात घेऊन पाणी सुटेपर्यंत ठिय्याच मांडला होता. नंतर मुस्लिम वस्त्यांना जाणूनबुजून पाणी देण्यात येत नाही, असा आरोप करीत एमआयएमच्या नेत्यांनी उग्र आंदोलन करीत समांतरच्या आॅफिसलाच टाळे ठोकले होते. त्याच वेळी त्यांनी रमजानच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नका, असा इशाराही दिला होता.

आज त्याच मालिकेत गुलमोहर काॅलनी व सत्यमनगरच्या नागरिकांनी आंदोलन केले. या वाॅर्डांत आज सकाळी वेळेनुसार साडेपाच वाजता पाणी येणे अपेक्षित होते. सहाव्या दिवशीही वाट पाहून पाणी न आल्याने नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्यासह या भागातील नागरिक साडेसहा वाजताच एन-५ च्या टाकीवर गेले.

फोन करूनही कोणी आले नाही
आधी आमच्या भागाला पाणी द्या, अशी मागणी या नागरिकांनी कर्मचा-यांकडे केली. या कर्मचा-यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर काही जणांनी औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांना फोन केले. पण एकही अधिकारी आला नाही.
उपमहापौरांनाही प्रतिसाद नाही : उपमहापौरांनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व समांतरच्या अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच त्यांना प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्यांनी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांना फोन करून परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे सांगत झाला प्रकार त्यांच्या कानी घातला. आयुक्त म्हणून कठोर भूमिका घ्या, असेही त्यांनी सांगितले.

अखेर पाेलिस आले : नेत्यांनाही असा अनुभव आल्याने नागरिक अधिकच संतापले. आम्हाला पाणी मिळत नाही तर मग पाणी जाते कुठे, असा सवाल करीत समांतरवाले पाण्याचा धंदा करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे पाहून पोलिसांना कळवण्यात आले. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याने लगेच मोठी कुमक एन-५ च्या टाक्यांवर पाठवली. पोलिस येताच त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही काही जण ऐकायच्या मन:स्थितीत नव्हतेच. शेवटी गुन्हे दाखल करण्याचे इशारे देताच जमाव हळूहळू पांगला व त्यांनी माघार घेतली.

दुपारनंतर टँकर सुरू : आजच्या या प्रकारात जवळपास ३० ते ४० टँॅकरची हवा सोडण्यात आल्याने ज्या भागात हे टँकर जाणार होते तेथील वेळापत्रक कोलमडले. साडेनऊ वाजेनंतर टाकीवरून पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. हवा भरून सारे टँकर रवाना होईपर्यंत मात्र दुपार झाली होती.

पोलिस आयुक्तांनी लक्ष घातले
एन-५ च्या टाकीवरील प्रकार सकाळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना समजला. पाण्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे ध्यानात आल्याने त्यांनी सोमवारी सकाळी ११ वा.मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व समांतरचे अधिकारी यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते कोणाला धारेवर धरतात या धास्तीने अधिका-यांची झोप उडाली आहे.

पोलिसांत तक्रार : दरम्यान, सिडको पोलिस ठाण्यात नगरसेवक राखी देसरडा यांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची रीतसर तक्रार रविवारी दुपारी दाखल केली. उपमहापौर, स्थायी समिती सभापती व सर्व नगरसेवक तिथून आयुक्त महाजन यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी बैठक होऊन समांतरचे पॅकअप करा, अशी एकमुखी मागणी भाजपने केली.

हवा सोडली, पाइप तोडले
तहानलेला जमाव चांगलाच भडकला. त्यातील काही लोक थेट टाकीवर पाणी भरायला आलेल्या टँकरवर चाल करून गेले. आवारात उभ्या टँकरची त्यांनी आधी हवा सोडून दिली. काही लोक टँकरवर चढून बसले. एवढेच नव्हे तर पाणी भरायचे पाइपही त्यांनी तोडून टाकले.

टेबल, खुर्च्यांचीही मोडतोड
काही लाेकांचा जमाव थेट कार्यालयात घुसला व त्यांनी तेथील टेबल व खुर्च्यांची तोडफोड सुरू केली. आतले टेबल, खुर्च्या बाहेर आणून फेकण्यात आल्या.

सभापतींच्या कारलाही प्रसाद
एकापाठोपाठ एक घटना घडत असल्याने तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, नगरसेवक राजगौरव वानखेडेही तेथे आले. नागरिकांनी या गडबडीत थोरात यांच्या वाहनाची हवा सोडून दिली.