आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तलवारीने हल्ला, लुटले १७ लाख, गुन्हेगारीच्या उद्रेकामुळे शहरवासीयांमध्ये चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पंडित कॉलनीतील याच रस्त्यवरील पूजा अपार्टमेंट येथे रक्कम लुटण्यात आली. इन्सेटमध्ये हल्ल्यात जखमी खंडू शिरसाट.)
नाशिक- मद्यविक्रीचा रोजचा भरणा गोळा करून मालकाच्या घरी रक्कम घेऊन जाणाऱ्या टेम्पोचालकावर तलवारीने हल्ला करून १७ लाख ७६ हजारांची रक्कम लुटून नेण्याचा प्रकार रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास उच्चभ्रू वस्तीमध्ये घडला. जखमी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या गुन्ह्यांमुळे शहरवासीयांमध्ये चिंता पसरली आहे.
पंडित कॉलनी परिसरातील ठक्करनगर येथील पूजा अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार घडला. खंडू लक्ष्मण शिरसाट (४१, रा. उंटवाडी) हे मद्य व्यावसायिक अतुल मदन यांच्याकडे कामास आहेत. शिरसाठ हे टेम्पो (एमएच १५, डीके १२६३) या वाहनातून शहरातील सात मद्य विक्री दुकानांचे रोजचे कलेक्शन करत १७ लाख रुपयांची रक्कम घेऊन पंडित कॉलनी येथील ठक्करनगरात अतुल मदन राहत असलेल्या पूजा अपार्टमेंट येथे आले. टेम्पोतून रक्कम असलेली बॅग उचलत असताना अचानक चार ते पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने त्यांच्या डोक्यात तलवार घालून त्यांना गंभीर जखमी केले रक्कम असलेली बॅग घेऊन तीन दुचाकींवर आलेले दरोडेखोर फरार झाले.
सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार आला. गंभीर जखमी अवस्थेतील चालकास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी एन. डी. पटेलरोडवर युवकाचा खून झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात तोडफोड झाल्याने शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचवेळी दरोडेखोरांनी संधी साधली. लुटमारीच्या प्रकाराबाबत व्यावसायिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी तपास करीत आहेत.
संशयित परिसरातील सीसीटीव्हींमध्ये कैद..
संशयितसीसीटीव्हींमध्ये कैद झाले असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरात बहुतांशी रहिवासी हे मोठे व्यावसायिक आहेत. बंगला आणि इमारतीच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज तपासणी करण्याचे काम सुरू आहे.
जखमी असूनही कर्तव्यदक्ष
सहायकपोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर दगडफेकीत जखमी झाले. उपचार सुरू असताना दरोड्याची माहिती मिळाली. उपचार सुरू असतानाही ते पोलिस अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना देत होते.
पाळत ठेवून लुटले
संशयितांनीपाळत ठेवून लुटले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत. लुटमारीची पद्धत सराईत गुन्हेगाराप्रमाणे आहे. परजिल्ह्यातील संशयित गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यात आली आहे. माहीतगार व्यक्तीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस आयुक्तपदाची एप्रिलला खांदेपालट झाल्यानंतर शहरात ३१ मेपर्यंतची गुन्ह्यांमधील वाढ-

बलात्कार : 1
खुनाचा प्रयत्न : 5
खून : 7
चेन स्नॅचिंग : १०
जबरी चोरी : 6
दरोडा : 3
दुचाकी चोरी : ४९
चोरी : ३१
घरफोडी : १५
ठकबाजी : 7
विश्वासघात : 2
दंगे : 5
विनयभंग : 9
दुखापत : २२
अपहरण : १४
८२ इतर गुन्हे